Type Here to Get Search Results !

जामनेर येथे मित्रांनीच केला मित्राचा खून...कुटुंबाचा हृदय हेलावणारा आक्रोश. आरोपी कडून गुन्हा कबूल.




 दिशा लाईव्ह न्यूज --::--एका खाजगी कंपनीत सोबत काम करणाऱ्या मित्रांमधील जुन्या वादाचे रूपांतर भीषण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यात उघडकीस आली आहे.

 जामनेर येथील बेपत्ता तरुण निलेश राजेंद्र कासार (३०) याची त्याच्याच दोन मित्रांनी गळा दाबून हत्या केली आणि मृतदेह पोत्यात भरून धरणात फेकून दिला. एमआयडीसी पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे या गुन्ह्याचा छडा लावला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मयत निलेश कासार हा जळगाव येथील एलटीआय फायनान्स कंपनीत कार्यरत होता. याच कंपनीत संशयित आरोपी दिनेश चौधरी  (२०, रा. तळई, ता. एरंडोल) हा देखील कामाला आहे, तर भूषण बाळू पाटील (२०, रा. पिंपरी, ता. चोपडा) हा पूर्वी तिथे कामाला होता. 



काही महिन्यांपूर्वी निलेश आणि भूषण यांच्यात किरकोळ कारणावरून मोठे भांडण झाले होते. भूषणने या भांडणाचा राग मनात धरून निलेशचा काटा काढण्याचे ठरवले होते.

                         असा रचला हत्येचा कट

सोमवार, १५ डिसेंबर रोजी फायनान्सच्या एका प्रकरणावर चर्चा करण्याच्या बहाण्याने भूषण आणि दिनेश यांनी निलेशला शिरसोली येथे बोलावून घेतले. तिथे चर्चा सुरू असताना पुन्हा वाद झाला आणि संशयितांनी दोरीने निलेशचा गळा आवळून त्याला ठार केले. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी मृतदेह एका पोत्यात भरला आणि नेव्हरे धरणाच्या पाण्यात फेकून दिला.

                          तपासात लागला छडा

निलेश बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली होती. तपासादरम्यान निलेशची दुचाकी रामदेववाडी परिसरात बेवारस स्थितीत मिळून आली. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड यांनी निलेशचे कॉल डिटेल्स तपासले असता, त्याचे शेवटचे बोलणे दिनेश आणि भूषणसोबत झाल्याचे समोर आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

                     धरणातून मृतदेह बाहेर काढला

 आज शुक्रवारी (१९ डिसेंबर) सकाळी संशयितांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी नेव्हरे धरणातून निलेशचा मृतदेह बाहेर काढला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, निरीक्षक बबन आव्हाड आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून, निलेशच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.


या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments