पहूर प्रतिनिधी-:-ता. जामनेर
दिशा लाईव्ह न्यूज। --::--- पहूर येथील संतोषी माता नगरात आज दुपारी भर दिवसा घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा धाडसी प्रयत्न झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
संतोषी माता नगर येथील धनराज चौधरी हे पत्नीसमवेत शेतात गेल्याने घराला कुलूप लावून गेले होते. दरम्यान, दुपारी साडेअडीच ते तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी टीव्ही चालू करून घरातील सामान अस्ताव्यस्त केले आणि चोरी करण्याचा प्रयत्न केला. घटना समजताच परिसरातील नागरिक घरासमोर जमा झाले. त्याचवेळी पहूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
याच भागात मागील ३ डिसेंबर २०२५ रोजी लक्ष्मी नगर येथे देखील भर दिवसा चोरीची मोठी घटना घडली होती. संत रुपलाल महाराज मंदिराजवळ राहणारे गजानन रघुनाथ गोंधनखेडे यांच्या घरी दुपारी दीड ते अडीचच्या दरम्यान घरफोडी झाली होती. या चोरीत दीड लाख रुपये रोख व दोन तोळे सोने असा मिळून चार लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता.
तसेच त्याच दिवशी पहूर पेठ येथील आठवडे बाजारात दिलीप बारी (फुसे) यांच्या जय रेणुका टी सेंटर मधून चोरट्यांनी पैशाचा गल्ला चोरून नेला होता. या घटनेत दोन हजार रुपये चोरट्यांनी पळविले होते.
दरम्यान, या सर्व चोरीच्या घटनांमधील चोरट्यांचा अद्याप तपास लागलेला नाही, आणि भर दिवसा होत असलेल्या या वारंवार चोरीच्या घटनांमुळे या चोरट्यांचे धाडस अधिक वाढत असल्याची चिंता नागरिक व्यक्त करत आहेत.
नागरिकांकडून या चोऱ्यांचा तपास लवकरात लवकर पूर्ण करून आरोपींना अटक करावी, तसेच परिसरात अधिक गस्त वाढवावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे

Post a Comment
0 Comments