पहूर प्रतिनिधी.
दिशा लाईव्ह न्यूज--::--- पहूर (ता. जामनेर) – पहूर येथील तुळसाई क्लिनिकचे संचालक तथा चैतन्य आयुर्वेद महाविद्यालय येथील प्राध्यापक डॉ. गोपाल कडूबा वानखेडे यांचे दिनांक २५ रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास जहांगीर रुग्णालय, पुणे येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने पहूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अभ्यासू, मितभाषी आणि संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. वानखेडे परिचित होते. शिक्षकप्रिय विद्यार्थी ते विद्यार्थीप्रिय शिक्षक हा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला. आयुर्वेद विषयाचा त्यांचा गाढा अभ्यास असून अध्यापनात त्यांनी उच्च गुणवत्ता जपली. विद्यार्थ्यांशी आत्मीयतेने वागणे, शंकांचे संयमाने निरसन करणे आणि संशोधनाची प्रेरणा देणे ही त्यांची वैशिष्ट्ये होती.
मागील आठ–दहा दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू होते. सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळींमध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले. पहूर कसबे विविध कार्यकारी सोसायटीमध्ये ते संचालक म्हणूनही कार्यरत होते.
आज गुरुवारी वैकुंठधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई व भाऊ असा परिवार आहे.
डॉ. गोपाल वानखेडे यांच्या निधनाने आयुर्वेद क्षेत्र, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्याची व व्यक्तिमत्त्वाची आठवण सदैव प्रेरणा देत राहील. त्यांच्या अकाली जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे .

Post a Comment
0 Comments