Type Here to Get Search Results !

संशयाच्या आहारी जात पतीने संपवला स्वतःचाच संसार; गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी जळगावात घडली मन सुन्न करणारी घटना!! तिघेही निष्पाप मुले अनाथ.



दिशा लाईव्ह न्यूज--::---माणसाच्या मनात एकदा का संशयाने घर केले, की त्याचे परिणाम किती भयंकर आणि विनाशकारी असू शकतात, याचा प्रत्यय देणारी एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना जळगाव शहरात उघडकीस आली आहे. 

संपूर्ण महाराष्ट्र गुढीपाडवा आणि नवीन वर्षाचा आनंद अत्यंत उत्साहात साजरा करत असताना, जळगावमधील निमखेडी शिवार परिसरात एका पतीने आपल्याच पत्नीवर जीवघेणा हल्ला करत तिचा अंत केला.

 या घटनेनंतर आरोपी पतीने थेट जळगाव तालुका पोलीस ठाणे गाठून आपल्या गुन्ह्याची सविस्तर कबुली दिली. "मी माझ्या पत्नीला संपवले आहे, मला आता अटक करा," असे सांगत तो स्वतःहून पोलिसांना शरण आला. ऐन सणाच्या दिवशी घडलेल्या या गंभीर प्रकरणामुळे संपूर्ण शहर हादरून गेले आहे.

​पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, मयत महिलेचे नाव दिपाली नितीन सोनवणे असे असून, आरोपी पतीचे नाव नितीन विजय सोनवणे आहे. नितीन हा रोजंदारी आणि हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. 

त्यांच्या कुटुंबात दोन मुलं व एक मुलगी आणि एका डोळ्याने अधू असलेली वयोवृद्ध अंध आई असा परिवार एकत्र राहत होता. मागील ४ वर्षांपासून नितीन आणि दिपाली यांच्यात कौटुंबिक कारणांवरून आणि प्रामुख्याने चारित्र्याच्या संशयावरून सतत खटके उडत असत. या सततच्या कौटुंबिक कलहामुळे ते अनेकदा एकमेकांपासून विभक्तही राहिले होते. पत्नी दिपाली ही भांडणानंतर अनेकदा घर सोडून निघून जायची, असे आरोपीने पोलिसांना सांगितले.

​घटनेच्या दिवशी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा एकदा जुन्या कारणांवरून कडाक्याचे भांडण उफाळून आले. या वादाचे रूपांतर मोठ्या झटापटीत झाले आणि संतापाच्या भरात नितीनने दिपालीच्या डोक्यावर विटेने आणि मानेवर तसेच पोटावर लोखंडी विळ्याने अत्यंत गंभीर आणि तीव्र वार केले. 

या प्राणघातक हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने दिपालीने जागीच प्राण सोडले. घटनेनंतर नितीन स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा दिपाली अत्यंत गंभीर अवस्थेत निपचित पडलेली आढळून आली.

​क्षुल्लक संशयाने एका हसत्याखेळत्या कुटुंबाची अक्षरशः राखरांगोळी केली आहे. आईने प्राण गमावले आणि वडील कायमचे गजाआड गेल्यामुळे त्यांची तीनही निष्पाप मुले आता अनाथ आणि पोरकी झाली आहेत. या लहानग्यांचा यात काय दोष? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत असून, या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे.



Post a Comment

0 Comments