पहूर प्रतिनिधी-:-ता. जामनेर
दिशा लाईव्ह न्यूज -:-पहूर येथील देवळी धरणात बुडून तेरा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पहूर पेठ येथील मन्सुरी मोहल्ल्यातील रहिवासी खलील पिंजारी यांचा मुलगा आदिल खलील पिंजारी हा आपल्या मित्रांसह अल्बकश पिंजारी व आवेश पिंजारी यांच्यासोबत देवळी धरण परिसरात गेला होता. पोहण्यासाठी त्याने पाण्यात उडी घेतली; मात्र धरणातील गाळात पाय अडकल्याने त्याला बाहेर येता आले नाही.
आदिल बराच वेळ पाण्याबाहेर न आल्याने सोबतच्या लहान मुलांनी आरडाओरडा केला; परंतु त्या वेळी परिसरात कोणीही नसल्याने मदत मिळू शकली नाही. काही वेळाने शेतातील कामगारांना मुलांचा आक्रोश ऐकू आल्यावर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. शोध घेतल्यानंतर धरणाच्या तळाशी बुडालेला आदिलचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
तत्काळ त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठारे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल पाटील करीत आहेत.
दरम्यान, आदिलच्या अकस्मात मृत्यूमुळे शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण पहूर गाव हळहळ व्यक्त करत आहे. आदिल हा पहूर येथील आर. टी. लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता आठवी (क) मध्ये शिक्षण घेत होता. त्याच्या निधनाने शाळा परिसरातही शोक मग्न वातावरण निर्माण झाले आहे.


Post a Comment
0 Comments