प्रतिनिधी : दत्तात्रय काटोले, सोयगाव
दिशा लाईव्ह न्यूज-:--सोयगाव तालुक्यातील कंकराळा–रावेरी गावातील तसेच मेणगाव येथून जवळच असलेल्या कंकराळा वैभव संतोष दाभाडे यांनी महाराष्ट्र पोलीस (अमरावती ग्रामीण) दलात निवड मिळवून गावाचा मान उंचावला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे.
वैभव दाभाडे हे शेतमजूर व भूमिहीन कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील संतोष पंडित दाभाडे हे दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून कष्ट करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. रोजंदारीवर जगणाऱ्या या कुटुंबाने अनेक अडचणींचा सामना केला; मात्र वडिलांनी कधीही हार मानली नाही आणि मुलालाही हार मानू दिली नाही.
कंकराळा–रावेरी गावातून महाराष्ट्र पोलीस दलात निवड होणारा वैभव दाभाडे हा पहिलाच युवक ठरला आहे. त्यामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून त्यांच्या यशामुळे गावाचा इतिहास घडला आहे.
पूर्वी गावात “सरकारी नोकरी आपल्यासाठी नाही” अशी नकारात्मक भावना होती. तालुका मुख्यालय अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असूनही अनेकांना संधी मिळाली नव्हती. मात्र वैभवने या मानसिकतेला छेद देत आपल्या जिद्दीने यशाची नवी दिशा दाखवली आहे.
“गरीबी आड येत नाही, जिद्द मोठी असली की यश मिळते,” हे वैभवच्या यशातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
ग्रामपंचायत कंकराळा–रावेरीतर्फे संतोष दाभाडे व वैभव दाभाडे यांचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.


Post a Comment
0 Comments