Type Here to Get Search Results !

महामार्गावर पोलिसांची धडाकेबाज ॲक्शन ! आंतरराज्य गांजा माफियांच्या टोळीचा सिनेस्टाईल पर्दाफाश ! ३ दिवसांची पोलीस कोठडी — धुळे ते मुंबई रॅकेट उघडकीच्या मार्गावर


पहूर प्रतिनिधी-- ता. जामनेर

दिशा लाईव्ह न्यूज---:::---जळगाव-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ एफ वर पहूरजवळील वाकोद शिवारात स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) जळगाव आणि पहूर पोलिसांनी राबविलेल्या थरारक कारवाईत गांजा तस्करांच्या आंतरजिल्हा टोळीचा अक्षरशः चित्रपटालाही लाजवेल असा पाठलाग करून पर्दाफाश करण्यात आला.

 या कारवाईने अमली पदार्थ माफियांचे धाबे दणाणले असून पकडलेल्या संशयीतांना जामनेर न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी महामार्गावर सापळा रचला. जळगावकडून भरधाव वेगाने येणारी इनोव्हा कार (क्र. एमएच ०४ डीजे २०४२) संशयित आढळताच पोलिसांनी पाठलाग सुरू केला. पोलिसांना चकवा देण्याचा आरोपींचा आटोकाट प्रयत्न फोल ठरला आणि एलसीबी व पहूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने सिनेस्टाईल कारवाई करत वाहन अडवून गांजा माफियांच्या मुसक्या आवळल्या.


कारवाईदरम्यान गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार क्र. एमएच १८ डब्ल्यू २५२६ देखील जप्त करण्यात आली. आरोपींकडून तब्बल ५० ते ५५ किलो गांजा, अंदाजे २ ते २.५ लाख रुपये किमतीचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला असून हा साठा मोठ्या तस्करीसाठी नेला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल संदीप धनगर यांच्या फिर्यादीवरून

इरफान अक्रम शेख (३२, गोरेगाव),

रोहित संजय इंगवले (२४, पनवेल),

अमन ताज खान (३६, अंधेरी वेस्ट, मुंबई),

तोहसीब खान रसूल खान (३०),

नईम शेख याकूब (३३),

आबीद मेहमूद खान (३७, सुलतानपूर)

यांच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


जळगाव फॉरेन्सिक पथकाने जप्त गांजाची तपासणी करून नमुने प्रयोगशाळेकडे पाठवले असून या प्रकरणातून धुळे-मुंबईपर्यंत पसरलेल्या अमली पदार्थ साखळीचा मोठा खुलासा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कोठारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते पुढील तपास करत आहेत.


महामार्गावर पोलिसांनी दाखविलेल्या या धाडसी अॅक्शनमुळे अमली पदार्थ माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पहूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments