दिशा लाईव्ह न्यूज--::--पाचोरा तालुक्यातील लोहारा हे सुमारे वीस हजार लोकसंख्येचे मोठे गाव असून भाजीपाला उत्पादनासाठी या गावाची तालुक्यात ओळख आहे. गावात मोठी बाजारपेठ असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात व्यापारी, शालेय विद्यार्थी तसेच कामानिमित्त तालुका व जिल्हा ठिकाणी जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांची वर्दळ असते. मात्र याच लोहारा गावातील बसस्थानक परिसरात भररस्त्यावर भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने थाटल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असल्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
या पूर्वी काही महिन्यांपूर्वी भाजी विक्रेते हे नवीन ओट्यांवर बसायला लागले होते.त्यावेळेस लोहारा बसस्थानक व परिसरातील व्यवसायिकांनी मोकळा श्वास घेतला होता. मात्र काही आडमुठे भाजीपाला विक्रेते पुन्हा या वर्दळ ठिकाणीच बसायला लागल्याने पुन्हा "येरे माझ्या मागल्या" सारखी परिस्थिती उदभवली आहे.
लोहारा बसस्थानक परिसरात दररोज दुपारी दोन वाजेपासून भाजीपाला उत्पादक शेतकरी व भाजीपाला विक्रेते बसस्थानक परिसरातच रस्त्यावर दुकाने लावून बसत असल्याने या परिसराला अक्षरशः 'सब्जीमंडी'चे स्वरूप प्राप्त होत आहे. या ठिकाणी या पुढेही मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या ठिकाणी संध्याकाळच्या सुमारास भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी होत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. याच वेळी जळगाव, पाचोरा व शेंदुर्णी या मार्गावरील एस. टी. बसेस, खाजगी ट्रॅव्हल्स तसेच मालवाहतूक वाहनांचीही मोठी ये-जा सुरू असते. तसेच मराठी मुलांची शाळा,कन्याशाळा, विद्यालय यातील विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना याच ठिकाणाहून जावे लागते. परिणामी वाहतुकीवर ताण वाढून अपघातांचा मोठा धोका निर्माण होत आहे.
बसस्थानक परिसरातील या अव्यवस्थित भाजीबाजारामुळे आतापर्यंत अनेक लहान-मोठे अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. काल सायंकाळी देखील एका दुचाकीस्वाराने वीस वर्षीय युवकाला जोरदार धडक दिल्याची घटना काल संध्याकाळी घडली आहे. . या अपघातात गरीब कुटुंबातील भोई नामक युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
लोहारा येथील कर्तव्यदक्ष स्व.सरपंच अक्षय कुमार जैस्वाल यांच्या कारकिर्दीत भाजीपाला विक्रेत्यांसाठी लोहारा ग्रामपंचायतीने प्रभू श्रीराम मंदिर व ग्रामपंचायत परिसरात स्वतंत्र ओटे बांधून दिलेले आहेत. त्या ठिकाणी विक्रेत्यांनी दुकाने लावून भाजीपाला विक्री करावी, अशी मागणी होत असून व्यवस्था असतांनाही काही विक्रेते बसस्थानक परिसरातच आडमुठेपणाने दुकाने लावत असल्याची तक्रार लोहारा अनेक तरुणांनी व ग्रामस्थांनी लोहारा ग्रामपंचायतिला निवेदन दिले आहे. या निवेदनात विशेषतः अनेक तरुणांनी सह्यांचे निवेदन लोहारा ग्रामपंचायतला दिले आहे.
तसेच या संदर्भात लवकर कारवाई न केल्यास तरुण वर्ग व ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
बघूया या गंभीर समस्येकडे लोहारा ग्रामपंचायत व संबंधित अधिकारी किती जातीने लक्ष देतात, हे उत्सुकतेचे ठरणार आहे.
या परिस्थितीमुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बसस्थानक परिसरात भररस्त्यावर भाजीपाला विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना ग्रामपंचायतीने नेमून दिलेल्या जागेतच भाजीपाला विक्री करण्यास भाग पाडावे तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.




Post a Comment
0 Comments