Type Here to Get Search Results !

सोयगाव : बहिरोबा मंदिर रस्त्यासाठी ३ कोटींचा निधी; काम संथगतीने, यात्रेपूर्वी पूर्ण होणार का?



सोयगाव : प्रतिनिधी

दिशा लाईव्ह न्यूज--::---खान्देश व मराठवाड्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सोयगाव येथील ग्रामदैवत बहिरोबा (भैरवनाथ) महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष रस्ते विकास निधीतून या ४ किलोमीटर रस्त्यासाठी तब्बल ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून काम पूर्ण करण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

 मात्र सध्याची कामाची गती पाहता २ एप्रिल रोजी होणाऱ्या बहिरोबा यात्रेपूर्वी रस्ता पूर्ण होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.



सोयगावपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेले बहिरोबा महाराजांचे देवस्थान जागृत म्हणून प्रसिद्ध आहे. दर रविवारी येथे नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. मात्र मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. जुन्या रस्त्यावरील डांबर पूर्णपणे निघून गेले असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.



या मार्गावरील दोन मोठ्या नाल्यांवरील पुलांचे काम पूर्ण झाले असले तरी मुख्य रस्त्याचे डांबरीकरण अद्यापही रखडले आहे. दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्त बहिरोबा महाराजांची भव्य यात्रा भरते. 

यंदा २ एप्रिल रोजी होणाऱ्या यात्रेसाठी बारा गाड्या ओढून नवस फेडण्याची परंपरा असून हजारो भाविक येथे दाखल होतात. यात्रेला अवघा एक महिना शिल्लक असताना प्रशासनाने रस्त्याच्या कामाला गती देणे आवश्यक असल्याची मागणी ग्रामस्थ व भाविकांकडून होत आहे.



निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मात्र आतापर्यंत केवळ रस्त्याच्या साइड पट्ट्या खोदून मुरूम टाकण्याचे कामच झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेली ३१ मार्चची मुदत संपण्यास आता अवघा एक महिना शिल्लक आहे. या मर्यादित काळात डांबरीकरण पूर्ण न झाल्यास यात्रेकरूंना धूळ, खड्डे आणि खराब रस्त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यातच पावसाळा सुरू झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.


(त्वरित संपर्क साधा--जळगांव जिल्हाध्यक्ष-दिनेश चौधरी, लोहारा.)


दरम्यान, आमदार अब्दुल सत्तार यांनी गेल्या तीन वर्षांपासून हा रस्ता पूर्ण होईल, असे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात काम का रखडले आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच खाजदार कल्याण काळे यांचाही या कामाकडे पुरेसा पाठपुरावा नसल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

प्रतिक्रिया-:-

सोयगाव–बहिरोबा रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. यात्रेपूर्वी काम पूर्ण करण्याबाबत संबंधित कंत्राटदाराला सूचना देण्यात आल्या आहेत. वेळेत काम पूर्ण न झाल्यास नियमांनुसार कारवाई केली जाईल.

— अजय टाकसाळ, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

प्रतिक्रिया-:-

भैरवनाथ महाराज मंदिर हे सोयगाव परिसरातील महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. मात्र मंदिराकडे जाणारा रस्ता मागील तीन वर्षांपासून खराब अवस्थेत आहे. दरवर्षी साइड पट्ट्यांचेच काम होते, परंतु रस्ता पूर्ण होत नाही. उद्घाटनासाठी नारळ फोडला जातो; मात्र प्रत्यक्षात रस्त्याची कामे पूर्ण होत नसल्याची ही मोठी शोकांतिका आहे.

— प्रदीप चौधरी, समाजसेवक, सोयगाव

Post a Comment

0 Comments