Type Here to Get Search Results !

अक्षय तृतीयेचे औचित्य साधत नांद्रेकरांचे (प्र. लोहारा) जलपूजन; जलक्रांतीची परंपरा कायम टँकरमुक्त ते आदर्श गाव: नांद्रेतील जलपूजनाचा प्रेरणादायी उपक्रम परंपरा, श्रद्धा आणि कृतीचा संगम; नांन्द्रा जलपूजन उत्साहात अक्षय तृतीया निमित्त नांद्रेत जलसंवर्धनाचा अनोखा संदेश जलक्रांतीची वाटचाल; नांद्रे गावात जलपूजन सोहळा संपन्न



 अक्षय विचार, परंपरा व कृतीतून नांद्रेकरांचे जलपूजन

दिशा लाईव्ह न्यूज--::--:: भारतीय संस्कृतीत अक्षय तृतीया हा सण अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा होणारा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असून भारतीय ज्योतिषशास्त्रात स्वयंसिद्ध मुहूर्त म्हणून ओळखला जातो. ‘अक्षय’ म्हणजे कधीही न संपणारे—या दिवशी केलेल्या दान, जप आणि पुण्याचे फळ अनंतकाळ टिकते, अशी श्रद्धा आहे.

पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी गंगा नदी पृथ्वीवर अवतरली, तसेच अन्नपूर्णा देवी यांचा प्रकट दिन म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो. शेतीप्रधान संस्कृतीत ‘अखाजी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवशी शेतकरी नवीन हंगामासाठी बी-बियाणांची पूजा करून मशागतीची सुरुवात करतात.



याच परंपरेचा वारसा पुढे नेत लोहारा येथुन जवळच असलेल्या  नांद्रे,ता.जामनेर  (प्र. लो.) गावात जलसंवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम राबविला जात आहे. कधीकाळी टँकरवर अवलंबून असलेल्या या गावात सन २०१८ मध्ये मा. मुख्यध्यापक्  व सामाजिक कार्यकर्ते  स्वर्गीय डब्ल्यू. एस. पाटील यांच्या पुढाकारातून सोनद नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू झाले. या कार्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. परिणामी, पहिल्याच वर्षी गाव टँकरमुक्त झाले.

यानंतर पाणी फाउंडेशन तसेच केशव स्मृती प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून दरवर्षी नदी खोलीकरणाचे काम सातत्याने सुरू आहे. विशेषतः मागील वर्षी २११ तास पोकलेन मशीनच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर काम करण्यात आले. 

या उपक्रमांमुळे नांद्रे गाव ‘पाणीदार’ आणि ‘आदर्श’ गाव म्हणून ओळख निर्माण करत आहे. श्री भरत दादा अमळकर आणि श्री अनिलजी भोकरे यांचे मार्गदर्शन गावाला लाभत आहे.



ग्रामविकास टीम व ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून कै. आधार पाटील यांनी सुरू केलेल्या जलपूजन परंपरेला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाजतगाजत मिरवणूक काढून अनेक जोडप्यांनी गंगा आरतीच्या सुरात विधिवत जलपूजन केले. यावर्षी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहिले.

                   नदी स्वच्छतेचा संकल्प.

या प्रसंगी गावकऱ्यांनी नदी शुद्धीकरण व स्वच्छतेचा संकल्प केला. “नदीत कचरा व प्लास्टिक टाकू नका, जलसाक्षर व्हा,” असे आवाहन श्री हरीष पाटील यांनी केले.

कार्यक्रमास ८५ वर्षांवरील जेष्ठ नागरिक श्री रघुनाथ आप्पा आणि विमलबाई पाटील यांनी उपस्थित राहून प्रेरणादायी उदाहरण घातले. नदी पूजनाचे महत्त्व आणि ग्रामविकासाच्या सकारात्मक बाबींवर सौ. रुपाली पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री दिवाकर पाटील, डॉ. सुनील पाटील, उपसरपंच श्री प्रकाश खरे, सदस्य श्री तुषार पाटील, श्री मधुकर पाटील, भजनी मंडळ तसेच ग्रामस्थ व महिलांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments