दिशा लाईव्ह न्यूज -:---पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोहारा दुरक्षेत्रात झालेल्या भीषण दुचाकी अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या अज्ञात आरोपीला अवघ्या २४ तासांच्या आत अटक करण्यात पिंपळगाव हरेश्वर पोलिसांना यश आले आहे. या तत्पर कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास अधिक दृढ झाला आहे.
घटना नेमकी काय?
दि. २८ एप्रिल २०२५ रोजी मंगळवारी पहाटे सुमारे १.०० ते १.३० वाजण्याच्या सुमारास लोहारा दुरक्षेत्र हद्दीतील म्हसास धरणाजवळ, तसेच इंग्लिश मीडियम स्कूलसमोर दोन मोटरसायकलींचा भीषण अपघात झाला. या अपघातात विजय रमेश भिल उर्फ सोनवणे हे गंभीर जखमी होऊन रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडले होते, तर मयूर साहेबराव भिल यांच्या तोंडावर गंभीर दुखापत झाली होती.
उपचारा दरम्यान मृत्यू
अपघातानंतर दोन्ही जखमींना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून विजय रमेश भिल उर्फ सोनवणे यांना मृत घोषित केले. या प्रकरणी अजय रमेश सोनवणे यांच्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे (जळगाव), अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर तसेच पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी तपासाची सूत्रे हातात घेतली. पोलिस हेडकॉन्स्टेबल तात्याबा नागरे व पोलिस कॉन्स्टेबल योगेश भिलखेडे यांचे विशेष पथक तयार करून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला.
२४ तासांत आरोपी जेरबंद
तपास पथकाने वेगाने हालचाली करत विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली. अखेर अवघ्या २४ तासांत आरोपीचा माग काढत कुंरंगी,ता.पाचोरा येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला आरोपीने गुन्हा नाकारला, मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन केलेल्या सखोल चौकशीत त्याने अपघात केल्याची कबुली दिली.
आरोपीची ओळख व पुढील कारवाई
आरोपी हा पाचोरा तालुक्यातील कुंरंगी येथील रहिवासी पंकज वसंत पाटील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी अपघातात वापरलेले वाहन जप्त केले असून पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल शांतिलाल पगारे करत आहेत.
पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक
अल्पावधीत आरोपीला अटक करण्यात यश मिळवल्यामुळे पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. अपघातानंतर आरोपीला पकडण्यात आलेली ही जलद कारवाई न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक बळकट करणारी ठरली आहे.


Post a Comment
0 Comments