Type Here to Get Search Results !

अज्ञात वाहनाच्या धडकेत पहूर येथील दुचाकीस्वार ठार सहावीतल्या सोहमकडून वडिलांना अग्नी; गावावर शोककळा


पहूर प्रतिनिधी, ता. जामनेर :

 दिशा लाईव्ह न्यूज--::--जळगाव–छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर भवानी माता मंदिराजवळ शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पहूर येथील ४५ वर्षीय नरेंद्र उर्फ बाळू वसंत बडगुजर यांचा जागीच मृत्यू झाला.


याबाबत अधिक माहिती अशी की, डेंटल इक्विपमेंट सेल्स अँड सर्व्हिस व्यवसाय करणारे नरेंद्र बडगुजर हे नेहमीप्रमाणे जळगावहून आपले कामकाज आटोपून दुचाकीने (क्र. एम एच १९ ईक्यू ८३ ५४ ) पहूरकडे येत होते. दरम्यान, मागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत ते काही अंतर फरफटत गेले. अपघात रात्रीच्या वेळी झाल्याने तात्काळ मदत न मिळाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.


महामार्गावरून जाणाऱ्या एका गॅरेज चालकाने घटनास्थळी थांबून दुचाकीच्या नंबर प्लेटवरून माहिती मिळवून नरेंद्र बडगुजर यांचे भाऊ डॉ. रवींद्र बडगुजर यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.


मृतदेहाचे पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी साडेतीन वाजता अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी सहावीत शिकणाऱ्या त्यांच्या चिमुकल्या मुलगा सोहमने वडिलांच्या चितेला अग्नी दिल्याने उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले.


नरेंद्र बडगुजर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी व भाऊ असा परिवार आहे. ते आर. टी. लेले हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक वसंत बडगुजर यांचे सुपुत्र होते, तसेच आई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. रवींद्र बडगुजर यांचे धाकटे बंधू होते. त्यांच्या अकाली निधनामुळे पहूर गावावर शोककळा पसरली आहे.


दरम्यान, या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.


वेगवान डंपरचा धोका पुन्हा समोर

महामार्गावर रात्रीच्या वेळी वाळू व गौण खनिज वाहतूक करणारे डंपर सुसाट वेगाने धावत असल्याने अपघातांचा धोका वाढत आहे. त्यामुळे डंपरच्या वेगावर नियंत्रण आणणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक असल्याचेही या घटनेतून अधोरेखित झाले आहे.

Post a Comment

0 Comments