Type Here to Get Search Results !

जिम्नॅस्टिक्समध्ये ओमकारला कांस्यपदक – ठाणे व जळगाव जिल्ह्याचा अभिमान! लोहारा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा!!



दिशा लाईव्ह न्यूज -:-(दिनेश चौधरी, लोहारा )-ओडिशातील भुवनेश्वर येथे आयोजित राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लोहारा या गावचा सुपुत्र, सध्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे वास्तव्यास असलेला ओमकार ईश्वर शिंदे याने शानदार कामगिरी करत कांस्यपदक पटकावले आहे. त्याच्या या यशामुळे ठाणे जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्याचेही नाव क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल झाले असून, लोहारा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.



ओमकारच्या यशामागे त्याच्या कुटुंबाची संघर्षमय पार्श्वभूमीही तितकीच प्रेरणादायी आहे. त्यांचे वडील ईश्वर सुपडू शिंदे हे मूळचे लोहारा येथील रहिवासी असून, नोकरीनिमित्त ते कल्याण येथे स्थायिक झाले. त्यांना स्वतःला लहानपणापासून कुस्तीची प्रचंड आवड होती; मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. हेच स्वप्न त्यांनी आपल्या मुलांमध्ये रुजवले आणि त्यांना क्रीडाक्षेत्रात पुढे जाण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले. आज ओमकारच्या यशातून त्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता होताना दिसत आहे.



२५ एप्रिल ते ३ मे २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील नामांकित व अनुभवी जिम्नॅस्ट सहभागी झाले होते. अत्यंत कडव्या आणि उच्च दर्जाच्या स्पर्धेत ओमकारने ‘रोमन रिंग्स’ या प्रकारात अप्रतिम संतुलन, अचूकता आणि शरीरावर पूर्ण नियंत्रण दाखवत परीक्षकांची मने जिंकली. हा प्रकार जिम्नॅस्टिक्समधील सर्वात कठीण प्रकारांपैकी एक मानला जातो, ज्यात प्रचंड ताकद, सहनशक्ती आणि एकाग्रता आवश्यक असते. या सर्व बाबींमध्ये ओमकारने उत्कृष्टता सिद्ध केली.



ओमकारचा यशाचा प्रवास सहज नव्हता. लहानपणापासूनच खेळाची आवड असलेल्या ओमकारने अनेक अडचणींवर मात करत जिम्नॅस्टिक्समध्ये आपले स्थान निर्माण केले. कल्याणजवळील ‘आकार जिम्नॅस्टिक्स’ या संस्थेत प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने दिवस-रात्र कठोर सराव केला. दररोज तासन्‌तास चालणाऱ्या सरावामुळे त्याची शारीरिक ताकद, लवचिकता, संतुलन आणि आत्मविश्वास अधिकाधिक बळकट होत गेला. अनेक वेळा अपयश आले, जखमा झाल्या, तरीही त्याने हार मानली नाही.

ओमकारच्या या यशामुळे क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाणे, जळगाव जिल्ह्यातील  लोहारा गावात आनंदोत्सवाचे वातावरण असून, नातेवाईक, मित्रपरिवार, क्रीडाप्रेमी आणि ग्रामस्थांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी त्याला भविष्यातील ऑलिम्पिक पदक विजेता म्हणूनही शुभेच्छा दिल्या आहेत.

ओमकार शिंदेची ही कामगिरी नवोदित खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत आहे. मर्यादित साधनसामग्री, प्रतिकूल परिस्थिती आणि अडचणी असूनही जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन यांच्या जोरावर मोठे यश मिळवता येते, हे त्याने सिद्ध करून दाखवले आहे.

आता सर्वांचे लक्ष ओमकारच्या पुढील वाटचालीकडे लागले आहे. आगामी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तो भारताचे प्रतिनिधित्व करून आणखी मोठी कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ओमकारच्या यशामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंनाही नवी दिशा आणि आत्मविश्वास मिळाला आहे.



Post a Comment

0 Comments