Type Here to Get Search Results !

पानटपरी चालक ते गटशिक्षणाधिकारी – विश्वनाथ धनके यांचा थक्क करणारा प्रेरणादायी प्रवास!! आज सेवापूर्ती सोहळा – शिक्षण क्षेत्रातील एका समर्पित प्रवासाला सलाम



पहूर (ता. जामनेर)

दिशा लाईव्ह न्यूज --::----अत्यंत साध्या परिस्थितीतून सुरू झालेला प्रवास, प्रचंड जिद्द, चिकाटी आणि शिक्षणाची अखंड ओढ यांच्या जोरावर उंच शिखर गाठणारे यावल तालुक्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ चावदास धनके आज दि. ३० एप्रिल रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन यावल येथील चित्रमंदिर हॉल, बोरावल गेट येथे सकाळी १०.३० वाजता करण्यात आले असून, शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.

मुंजलवाडी (ता. रावेर) या छोट्याशा गावातून जीवनप्रवासाला सुरुवात करणाऱ्या धनके सरांनी ६ ऑगस्ट १९९३ रोजी अप्रशिक्षित उपशिक्षक म्हणून सेवेत पदार्पण केले. मात्र, त्याआधी त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पानटपरी चालवली—यातूनच त्यांच्या संघर्षमय आयुष्याची खरी झलक दिसून येते. कठीण परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाचा ध्यास सोडला नाही, उलट सेवेत राहूनच विविध परीक्षा देत डी.एड., बी.एड. आणि अर्थशास्त्र विषयातील पदवी संपादन केली.

आपल्या कार्यकाळात त्यांनी उपशिक्षक, प्रभारी केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, पोषण आहार अधीक्षक अशा अनेक जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या. सध्या ते यावल येथे प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक शैक्षणिक उपक्रमांना गती मिळाली.

धनके सरांची खासियत म्हणजे त्यांचा जमिनीवरचा स्वभाव. अधिकारी पदावर असतानाही त्यांनी कधीही अधिकाराचा दिखावा केला नाही. शाळांना नियमित भेटी देणे, विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणे, त्यांच्याशी आत्मीयतेने संवाद साधणे आणि शिक्षकांना योग्य मार्गदर्शन करणे हा त्यांचा दैनंदिन भाग होता. त्यामुळेच ते केवळ अधिकारी न राहता शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात आपलेसे स्थान निर्माण करू शकले.

“परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षणाचा ध्यास घेतला, तर यश निश्चित मिळते” हा संदेश त्यांनी आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कृतीतून दिला. त्यांच्या या प्रवासाने अनेकांना प्रेरणा दिली असून, त्यांच्या कार्याची छाप शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ राहणार आहे.

शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या सेवापूर्तीच्या निमित्ताने त्यांना पुढील आयुष्यासाठी निरोगी, आनंदी आणि यशस्वी जीवनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

✍️ शब्दांकन – शंकर रंगनाथ भामेरे

उपशिक्षक, सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, पहूर (ता. जामनेर)

Post a Comment

0 Comments