Type Here to Get Search Results !

बीएफआयसमोर खोटे चित्र उभे करून बॉक्सर-कोचेसच्या भविष्याशी खेळ” – आमदार प्रविण दरेकर यांचा गंभीर आरोप!! महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनची निवडणूक, न्यायालयीन आदेश आणि बीएफआयच्या भूमिकेवर पत्रकार परिषदेत सविस्तर खुलासा!


मुंबई प्रतिनिधी / शौकत मुजावर

दिशा लाईव्ह न्यूज--::--महाराष्ट्र बॉक्सिंग क्षेत्रात सुरू असलेल्या वादाला आता राजकीय आणि कायदेशीर वळण मिळाले असून, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने मुंबईतील मराठी पत्रकार भवन येथे दि. २ एप्रिल २०२६ रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी आमदार प्रविण दरेकर यांनी बीएफआय (बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया) वर गंभीर आरोप करत, “स्वतःच्या असुरी हव्यासापोटी खोटे चित्र दाखवून राज्यातील बॉक्सर आणि कोचेस यांच्या आयुष्याशी खेळ केला जात आहे,” असा थेट हल्ला चढवला.


महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनची निवडणूक माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धर्मादाय आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्या देखरेखीखाली दि. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडली. निवडून आलेल्या कार्यकारिणीची यादी १७ नोव्हेंबर २०२५ रोजी बीएफआयकडे पाठवण्यात आली असतानाही, अद्याप अधिकृत संलग्नतेचे पत्र न मिळाल्याने संभ्रम कायम असल्याचे दरेकर यांनी सांगितले.


२०२२ मध्ये कार्यकाळ संपल्यानंतरही निवडणूक वेळेत झाली नाही

बीएफआयच्या ॲडहॉक कमिटीनेही निवडणुकीसाठी पुढाकार घेतला नाही

निवडणूक टाळण्यासाठी विविध कारणे देत प्रक्रियेत विलंब केल्याचे आरोप अखेर उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर निवडणूक प्रक्रिया मार्गी  मुंबई उच्च न्यायालयाने संपूर्ण प्रकरणाची सुनावणी करत, धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत पारदर्शक निवडणूक घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार ९ नोव्हेंबर २०२५ रोजी वरळी येथील सस्मिरा इमारतीत मतदान प्रक्रिया पार पडली व निकाल जाहीर करण्यात आला.


निवडणुकीनंतर पराभूत उमेदवारांनी न्यायालयात याचिका दाखल केली असून, बदल अर्जावरही आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे संघटनेच्या वैधतेवर अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


दरेकर यांनी आरोप केला की, मूळ महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन अस्तित्वात असताना कंपनी ॲक्ट अंतर्गत नव्याने स्थापन केलेल्या बेकायदेशीर संस्थेला बीएफआयने संलग्नता दिली आहे. हे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अपमान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

“ही १०० वर्षांची परंपरा असलेली संघटना आहे. न्यायालय आणि शासनाने मान्यता दिलेल्या संस्थेला डावलून चुकीचे निर्णय घेतले जात आहेत,” असे दरेकर यांनी ठामपणे सांगितले.


नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात दरेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. तसेच अलीकडील अधिवेशनात पॉइंट ऑफ ऑर्डरद्वारे हा मुद्दा उपस्थित केला असून, विधान परिषद अध्यक्षांनी क्रीडामंत्र्यांना स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहे

दरेकर यांनी ३ जानेवारी २०२६ रोजी गुडगाव येथे बीएफआयचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर कर्नल अरुण मलिक यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरण मांडल्याचेही सांगितले.


या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे जय कवळी, भरतकुमार व्हावळ यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.


महाराष्ट्र बॉक्सिंग क्षेत्रातील हा वाद केवळ संघटनात्मक नसून, हजारो खेळाडूंच्या भविष्याशी संबंधित असल्याने लवकरात लवकर स्पष्ट निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments