दत्तात्रय काटोले, सोयगाव
दिशा लाईव्ह न्यूज-:- : सोयगाव शहराचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांच्या चैत्र शुद्ध पौर्णिमेनिमित्त भरविण्यात आलेल्या यात्रा उत्सवाला यंदा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. पारंपरिक श्रद्धा, भक्तीभाव आणि उत्साह यांचा संगम साधणारा हा सोहळा भाविकांसाठी विशेष ठरला.
यात्रेनिमित्त सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. स्वयंभू लोण्याची मूर्ती हे या देवस्थानाचे प्रमुख वैशिष्ट्य असून, संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारची ही एकमेव मूर्ती असल्याचे मानले जाते. एप्रिल महिन्यातील वाढत्या तापमानामुळे लोणी वितळण्याची शक्यता लक्षात घेऊन मंदिरात ट्रस्टच्या वतीने एसीची व्यवस्था करण्यात आली असून त्यामुळे मूर्ती सुरक्षित ठेवण्यात यश आले आहे.
दुपारी महाआरतीनंतर यात्रेची सुरुवात करण्यात आली. यावेळी पारंपरिक बारा गाड्यांची भव्य मिरवणूक शहरातून मंदिराकडे काढण्यात आली. या मिरवणुकीत लहान मुलांच्या कमरेला नाळ बांधून गाड्या ओढण्याची जुनी परंपरा आजही जपली जात असल्याचे पाहायला मिळाले. ढोल-ताशांच्या गजरात, जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात ही मिरवणूक उत्साहात पार पडली.
मराठवाडा, खानदेश तसेच राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. अनेक भाविकांनी डाळ-बट्टीचा नवस अर्पण करून आपली श्रद्धा व्यक्त केली. “नवसाला पावणारे जागृत देवस्थान” म्हणून या मंदिराची ख्याती असून दरवर्षी येथे भाविकांची संख्या वाढत आहे.
यात्रा उत्सवाचे अध्यक्ष दिलीप बिर्ला व त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजनाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. मिरवणूक व इतर नियोजनासाठी स्थानिक मान्यवर, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
यंदा पार्किंगची योग्य व्यवस्था केल्यामुळे वाहतूक कोंडी टळली, याबद्दल नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले. सोयगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय गजानन आरेकर व त्यांच्या पथकाने कडक बंदोबस्त ठेवून उत्सव शांततेत पार पडण्यासाठी विशेष दक्षता घेतली.
गेल्या अनेक वर्षांची परंपरा जपत, श्रद्धा आणि एकोप्याचा संदेश देणारा भैरवनाथ महाराजांचा हा यात्रा उत्सव सोयगावकरांसाठी अभिमानाचा ठरला आहे.


Post a Comment
0 Comments