पहूर प्रतिनिधी.--(ता. जामनेर) –
दिशा लाईव्ह न्युज--::--- खानदेशला मराठवाड्याशी जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी जळगाव–जालना रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या कामाला वेग आला असून, या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्यांचे निराकरण करण्यासाठी १३ मे २०२६ रोजी पहूर येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती एरंडोल विभागाचे उपविभागीय अधिकारी मनीष कुमार गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, जळगाव ते जालना या नवीन रेल्वे मार्गासाठी मौजे पहूर (ता. जामनेर) येथील खाजगी जमिनींचे संपादन सुरू आहे. यासाठी रेल्वे अधिनियम कलम 20(A) अंतर्गत २६ मे २०२५ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यानंतर पुढील टप्प्यात भूमी अभिलेख विभागामार्फत संपादित जमिनींची संयुक्त मोजणी करण्यासाठी ६ एप्रिल २०२६ रोजी तारीख निश्चित करण्यात आली होती.
मात्र, प्रत्यक्ष मोजणीदरम्यान संबंधित भूधारकांनी विरोध दर्शवल्याने ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. याबाबतचा पंचनामा भूमी अभिलेख विभागाच्या प्रतिनिधींनी सादर केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रलंबित मोजणी, तांत्रिक अडचणी आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.
प्रशासनाकडून संबंधित शेतकरी व जमीनधारकांनी या बैठकीस उपस्थित राहून आपली मते व अडचणी मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, बाधित शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून, “पुरेसा मोबदला मिळाल्याशिवाय रेल्वे मार्ग होऊ देणार नाही” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. “शेताचा तुकडा हा केवळ जमीन नसून आमच्या काळजाचा तुकडा आहे. शासनाने आमच्या भावनांशी खेळ करू नये,” अशी भावना बाधित शेतकरी सुरेश घोंगडे यांनी व्यक्त केली.
या बैठकीत प्रशासन व शेतकरी यांच्यात सकारात्मक संवाद होऊन मार्ग निघणार का, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments