पहूर प्रतिनिधी-- ता. जामनेर (दि. ९) :
दिशा लाईव्ह न्यूज ---:::---आरोग्य हीच खरी संपत्ती असून विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच शारीरिक तंदुरुस्ती जपण्यासाठी विविध खेळांकडे वळले पाहिजे, असे प्रतिपादन पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांनी केले. ते येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रांगणात शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आयोजित ब्लॅक बेल्ट वितरण सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संचालक शंकर घोंगडे हे होते. यावेळी कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्नेहवस्त्र व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
प्रास्ताविक करताना शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक हरिभाऊ राऊत यांनी अकॅडमीच्या वाटचालीचा आढावा घेत विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि स्वसंरक्षणाची भावना निर्माण करण्यासाठी कराटे व इतर खेळांचे महत्त्व अधोरेखित केले. सूत्रसंचालन शंकर भामेरे यांनी तर आभार प्रदर्शनही समारंभात करण्यात आले.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात एपीआय प्रमोद कठोरे यांनी सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात मानसिक व शारीरिक संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिकाटी, संघभावना, निर्णयक्षमता आणि आत्मविश्वास विकसित होतो. त्यामुळे पालकांनीही आपल्या मुलांना खेळासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी मोहिनी राऊत, माहेश्वरी धनगर, हर्षदा उबाळे, स्वाती चौधरी, वेदांत क्षीरसागर, यश राऊत, दिनेश राऊत, हरीश घाटे, ईश्वर क्षीरसागर, भूषण मगरे, भावेश निकम, गौरी कुमावत, सतीश क्षीरसागर आदी खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आले. त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तसेच दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणारे आयान पिंजारी व ईशांत चौधरी या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास पोलीस कर्मचारी राहुल जोहरे व वैभव देशमुख यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशिक्षक भूषण मगरे, ईश्वर क्षीरसागर तसेच सर्व खेळाडूंनी परिश्रम घेतले.
समारोपाच्या वेळी ब्लॅक बेल्ट प्राप्त विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment
0 Comments