Type Here to Get Search Results !

वडिलोपार्जित जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार ! “जमीन आमची… निर्णयही आमचाच !” - तुषार बनकर पहूर येथे रेल्वे प्रकल्पाची आज बैठक



पहूर,प्रतिनिधी-:--- ता. जामनेर :

दिशा लाईव्ह न्यूज --::---सरकारी विकास प्रकल्पांच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याच्या हालचालींविरोधात आता शेतकरी आक्रमक झाले असून “आमची जमीन विकायची की नाही, हा निर्णय सरकारचा नव्हे तर शेतकऱ्यांचाच असणार,” असा थेट इशारा शेतकरी बांधवांनी दिला आहे.


पहुर येथे जळगाव जालना रेल्वे प्रकल्पाच्या तक्रार निवारण व समस्या निराकरण बैठकीचे आयोजन बुधवारी सकाळी साडेदहा वाजता चंदन कुमार मंगल कार्यालयात करण्यात आले असून शेतकरी बांधव आक्रमक झाल्याचे चित्र आहे .


“सरकारला जमिनीखालील खनिजांवर अधिकार असू शकतो; पण आमच्या वडिलोपार्जित जमिनीवर नाही,” अशी संतप्त भूमिका व्यक्त करत शेतकऱ्यांनी विकासाच्या नावाखाली होणाऱ्या अन्यायाविरोधात एल्गार पुकारला आहे. “विकासाला आमचा विरोध नाही; पण शेतकऱ्यांना गृहीत धरून, कवडीमोल मोबदला देऊन जमीन हिसकावण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही,” असा इशाराही देण्यात आला.




शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही भागात कोट्यवधींचा मोबदला दिला जातो, तर काही ठिकाणी अत्यल्प रक्कम देऊन शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे. “जमीन कुठलीच हलकी नसते. आज नापीक वाटणारी जमीनही शेतकरी आपल्या घामाने सुपीक बनवतो. गाळ, माती, खत, सिंचन याच्या जोरावर भविष्यात कोट्यवधींचे उत्पन्न देणारी जमीन आज जबरदस्तीने घेतली जात आहे,” अशी तीव्र भावना व्यक्त करण्यात आली.


“आज जमीन विकण्याची गरज नसताना आमची शेती हिरावली जात आहे. नवीन जमीन घेणे आता सामान्य शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर गेले आहे. बाजारभाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे केवळ पैशांचा मोबदला नव्हे, तर शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी ठोस पुनर्वसन झाले पाहिजे,” अशी मागणी बैठकीपूर्वी करण्यात आली.


शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या :

बाजारभावाच्या चार-पाच पट पैसे देण्याऐवजी चार-पाच पट पर्यायी जमीन देऊन पुनर्वसन करावे.


कमी प्रतीच्या जमिनींसाठीही किमान १ कोटी रुपये प्रति एकर मोबदला द्यावा.


विहीर, वीज पंप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, सोलर, बोअरवेल यांचा स्वतंत्र मोबदला द्यावा.


संपादनामुळे शेताचे दोन भाग होत असल्यास नवीन रस्ता अथवा मार्ग उपलब्ध करून द्यावा.


उभ्या फळबागा व हंगामी पिकांचे स्वतंत्र मूल्यांकन करून भरपाई द्यावी.


मोबदल्याची रक्कम टप्प्याटप्प्याने नव्हे तर एकरकमी द्यावी, जेणेकरून शेतकरी तातडीने दुसरी शेती घेऊ शकेल.


या मागण्यांसाठी उद्या आयोजित बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

“हक्कासाठी लढा… अन्यायाविरुद्ध एकजूट करा !”

असा निर्धार शेतकरी बांधवांनी व्यक्त केला आहे .


दरम्यान , सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी विकासाच्या नावाखाली ओरबडल्या जात असतील तर आम्ही स्वस्थ बसणार नाहीत असा इशारा तुषार बनकर , सुरेश घोंगडे यांनी दिला आहे .

Post a Comment

0 Comments