Type Here to Get Search Results !

जालना–जळगाव रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे गिरीश महाजन यांना निवेदन न्याय्य मोबदला व पुनर्वसनासाठी शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका


पहूर प्रतिनिधी--, ता. जामनेर

दिशा लाईव्ह न्यूज-:- : जालना–जळगाव रेल्वे प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी आज महाराष्ट्राचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी यावेळी न्याय्य मोबदला, पुनर्वसन आणि रोजगाराच्या मागण्यांवर ठाम भूमिका मांडली.


शेतकऱ्यांनी सादर केलेल्या निवेदनात प्रति एकर किमान २ कोटी रुपये मोबदला देण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच मोबदल्याची संपूर्ण रक्कम एकरकमी व न्यायालयीन प्रक्रियेत न अडकता थेट मिळावी, जेणेकरून शेतकऱ्यांना दुसरीकडे शेती घेऊन तातडीने उपजीविका सुरू करता येईल, अशी मागणी करण्यात आली. तुकड्यांत मिळणारा मोबदला उपयोगाचा राहत नसल्याची खंतही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.


याशिवाय शेतात उभ्या असलेल्या पिकांचे, विहिरींचे, सोलर प्रकल्पांचे, पाइपलाइन तसेच इतर बांधकामांचे स्वतंत्र मूल्यांकन करून वेगळा मोबदला द्यावा, अशी मागणी करण्यात आली. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देऊन कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात नमूद करण्यात आली.


पुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने प्रति एकर २ कोटी रुपयांचा एकरकमी मोबदला देण्यात आला, त्याच धर्तीवर कोणताही भेदभाव न करता जालना–जळगाव रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनाही समान न्याय द्यावा, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. तसेच रेल्वेमार्गामुळे विभागल्या जाणाऱ्या शेतजमिनींना हक्काचे रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली.


यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून यावर सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. रेल्वे प्रकल्पामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments