Type Here to Get Search Results !

राजकोट फटाका कारखान्याला भीषण आग — लाखोंचा माल जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली



पहुर प्रतिनिधी-- (ता. जामनेर) प्रतिनिधी :

 दिशा लाइव्ह न्यूज -:--पाळधी  .ता.जामनेर येथून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर, भवानी फाटा परिसरात जळगाव–छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत असलेल्या राजकोट फटाका कारखान्यात सोमवारी (दि.) पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. सकाळी सुमारे ६:३० वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण करत संपूर्ण परिसर हादरवून सोडला.

प्राथमिक माहितीनुसार, कारखान्यात शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत. कारखान्यातील गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा साठा असल्याने आग वेगाने पसरली आणि त्यानंतर झालेल्या स्फोटांची तीव्रता इतकी प्रचंड होती की महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी भीतीपोटी आपली वाहने थांबवून सुरक्षित अंतर राखले.


                 आगीचे भीषण रूप

सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आग येताच तत्काळ प्रयत्न सुरू करण्यात आले, मात्र फटाक्यांच्या साठ्यामुळे काही मिनिटांतच आगीने विक्राळ रूप धारण केले. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने ज्वाळा झपाट्याने पसरल्या. गोडाऊनमधील लाखो रुपयांचे फटाके जळून खाक झाले.

घटनास्थळी काही बकऱ्या बांधलेल्या होत्या. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र आगीच्या प्रचंड तीव्रतेमुळे तीन बकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

                    अग्निशमन दलाची धावपळ

आग नियंत्रणात आणण्यासाठी जामनेर येथून अग्निशमन दलाची पहिली गाडी घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर जळगाव आणि शेंदुर्णी येथूनही बंब मागवण्यात आले. एकूण ५ ते ६ अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली.



स्थानिक नागरिकांनीही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र स्फोट आणि ज्वाळांची तीव्रता लक्षात घेता आग आटोक्यात आणणे अत्यंत कठीण ठरत होते. जवळपास ३ ते ४ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सकाळी १० वाजेच्या सुमारास आग नियंत्रणात आणण्यात यश आले.

                   पोलिस प्रशासन घटनास्थळी

घटनेची माहिती मिळताच पहुर पोलीस स्टेशनचे अधिकारी दिपक पाटील व ईश्वर कोकणे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक केली.

                  सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

कारखान्यातील स्फोट आणि आगीची भीषणता पाहता मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही मानवी जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे.

                          पुढील तपास सुरू

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आग नेमकी कशामुळे लागली, सुरक्षा उपाययोजना कितपत पाळल्या जात होत्या याचा तपास पोलीस आणि संबंधित विभागांकडून सुरू आहे.

Post a Comment

0 Comments