पहूर प्रतिनिधी-- (ता. जामनेर)
दिशा लाईव्ह न्यूज -:---जामनेर तालुक्यातील पहूर येथे शनिवारी झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर गावात संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. जळगाव–छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३एफवर भरधाव पिकअपने सेंट्रो कारला धडक दिल्याने अमिनोद्दीन शेख कमरुद्दीन यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
रविवारी सकाळी अंत्यसंस्कारानंतर संतप्त नागरिकांनी मुस्लिम कब्रस्तानाबाहेर महामार्गावर ठिय्या आंदोलन करत काही काळ वाहतूक रोखून धरली. या अचानक झालेल्या आंदोलनामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी तत्परतेने धाव घेऊन नागरिकांची समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, स्थानिक प्रशासनानेही नागरिकांच्या भावना लक्षात घेत आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
नागरिकांची मुख्य मागणी म्हणजे गावाच्या चारही दिशांना तातडीने गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसविण्यात यावेत, जेणेकरून भविष्यात अशा अपघातांना आळा बसेल. यासंदर्भात राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधण्यात आला असून, लवकरच आवश्यक कार्यवाही होईल, अशी माहिती समोर येत आहे.
तथापि, उद्यापर्यंत मागणी पूर्ण न झाल्यास पुन्हा ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
या आंदोलनात शेख सलीम शेख गणी, मुन्ना पठाण, इका पहिलवान, इरफान शेख, तसलीम पिंजारी, शेख मोहिनुद्दीन, युसुफ बाबा, इस्माईल शेख, बंडू पाटील, भैया पठाण, अबू तडवी, शेख चांद तडवी, रवी मोरे, अनिल मोरे, फारुख मन्यार, सादिक शेख, ईश्वर हिवाळे, राजधर पांढरे, प्रदीप लोढा, श्याम सावळे , किरण पाटील, शैलेश पाटील, संजय पाटील आणि अर्जुन लहासे यांच्यासह विविध समाजघटकांतील नागरिक सहभागी झाले होते.


Post a Comment
0 Comments