दिशा लाईव्ह न्यूज--::---लोहारा (ता. पाचोरा) – तालुक्यातील लोहारा येथील तपेश्वर शिवारात वन्य प्राण्याच्या हल्ल्यात एक वासरी ठार झाल्याची घटना समोर आली असून, या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी किशोर राजाराम देशमुख यांच्या गट क्रमांक ६६९/२ मधील शेती काही वर्षांपासून मंगेश संजय कुंभार हे नफ्याने कसत आहेत. शेतीसोबत त्यांनी पशुपालन हा जोडधंदा सुरू ठेवला असून, त्यांच्या ताब्यात दोन गायी, दोन गोऱ्हे आणि एक वासरी अशी जनावरे होती. ही जनावरे ते शेतातच सुरक्षितरीत्या बांधून ठेवत होते.
मात्र, दिनांक १३ मे (बुधवार) रोजी मध्यरात्रीनंतर, अज्ञात वन्य प्राण्याने गोठ्यात घुसून एक वर्ष वयाच्या वासरीवर हल्ला केला. या हल्ल्यात वासरी गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाली. सकाळी ही घटना लक्षात येताच पशुपालकाने तात्काळ वनविभागाशी संपर्क साधला.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वनपरिक्षेत्र अधिकारी सरिता पाटील, वनपाल आरती सोनार, वनरक्षक गजानन आढावणे तसेच पशुवैद्यकीय विभागाचे प्रमोद जाधव यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. वासरीवर झालेल्या हल्ल्याचे स्वरूप पाहता हा हल्ला एखाद्या वन्य प्राण्याकडून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, संबंधित पशुपालकाला शासनाच्या नियमांनुसार नुकसानभरपाई मिळावी यासाठी आवश्यक ती प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. तसेच, परिसरातील शेतकरी व पशुपालकांनी रात्रीच्या वेळी जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत, तसेच शिवारात सतर्कता बाळगावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
या घटनेमुळे तपेश्वर शिवारात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वनविभागाने गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.


Post a Comment
0 Comments