दिशा लाईव्ह न्यूज--::-- पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक (ए.पी.आय.) कल्याणी वर्मा यांना “उत्कृष्ट महिला प्रभारी अधिकारी – जळगाव जिल्हा” हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
दिव्य मराठीच्या वतीने त्यांच्या उल्लेखनीय व प्रभावी कामगिरीची दखल घेत हा गौरव सोहळा पार पडला. या सन्मानामुळे संपूर्ण पोलीस विभागासह पाचोरा तालुक्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एपीआय कल्याणी वर्मा यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर अत्यंत कार्यक्षमतेने व कर्तव्यदक्षतेने आपली जबाबदारी पार पाडली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठोस व नियोजनबद्ध उपाययोजना केल्या. विशेषतः ग्रामीण भागात वाढत चाललेल्या अवैध धंद्यांवर त्यांनी कठोर पावले उचलत पोलिस प्रशासनाची प्रभावी छाप निर्माण केली.
गावठी दारू निर्मिती व विक्री, देशी-विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक, गांजा तस्करी तसेच इतर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यवसायांविरोधात त्यांनी सातत्याने धडक कारवाया केल्या. त्यांच्या या कारवायांमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी असे व्यवसाय पूर्णतः बंद पडल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.
या मोहिमेमुळे परिसरातील तरुणाईला व्यसनमुक्त जीवनाकडे वळवण्यासाठी मोठी मदत झाली आहे.
युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी विविध अभियान, समुपदेशन शिबिरे व जनसंपर्क उपक्रम राबविण्यात आले. शाळा, महाविद्यालये तसेच ग्रामसभांमधून नागरिकांना कायद्याचे महत्त्व पटवून देत त्यांनी समाजप्रबोधनाचेही काम केले.
वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीनेही त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करताना नागरिकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. हेल्मेटचा वापर, सीटबेल्टचे महत्त्व, वेगमर्यादा याबाबत सातत्याने मोहीम राबविण्यात आली.
परिणामी परिसरातील वाहतूक शिस्तीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसून येते.
वरखेडी येथे दर गुरुवारी भरणाऱ्या गुरांच्या आठवडे बाजारातही त्यांनी विशेष लक्ष घातले. या बाजारात होणारी जनावरांची अवैध खरेदी-विक्री, बेकायदेशीर दलाली तसेच इतर गैरप्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी कठोर उपाययोजना केल्या. नियमित तपासणी, गस्त आणि कारवायांमुळे बाजारातील अनेक अवैध व्यवहारांना आळा बसला आहे.
एपीआय कल्याणी वर्मा यांच्या कार्यामुळे परिसरातील महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक माता-भगिनींनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत “आमचे संसार सुखाचे झाले” अशा भावना व्यक्त केल्या.
अवैध धंद्यांवर नियंत्रण आल्याने कुटुंबांचे आर्थिक व सामाजिक जीवन अधिक स्थिर झाले आहे.
कर्तव्यदक्षता, प्रामाणिकपणा आणि धाडसी निर्णयक्षमता यांच्या बळावर एपीआय कल्याणी वर्मा यांनी पोलीस सेवेचा आदर्श निर्माण केला असून, त्यांचा हा सन्मान इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.



Post a Comment
0 Comments