सुनील लोहार-:-- कुऱ्हाड प्रतिनिधी
दिशा लाईव्ह न्यूज --::---कुऱ्हाड व परिसरात सध्या शेती मशागतीची कामे मोठ्या वेगाने सुरू असून, यंदा शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेतीकडे वळताना दिसत आहे. रासायनिक खतांच्या किमतींमध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले असून, महागडी खते खरेदी करणे अनेकांना परवडेनासे झाले आहे. परिणामी, उत्पादन खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी आणि जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी शेतकरी पारंपरिक शेणखत व सेंद्रिय पर्यायांकडे वळत आहेत.
गेल्या काही वर्षांत रासायनिक खतांचा अतिरेकी वापर झाल्याने जमिनीची गुणवत्ता खालावली आहे. जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण घटले असून, जमीन कडक व निष्क्रिय (बंजर) बनत चालली आहे. याचा थेट परिणाम उत्पादनावर होत असून, खरीप व रब्बी हंगामात उत्पन्नात सातत्याने घट होत असल्याची तक्रार शेतकरी व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर सेंद्रिय शेती हा अधिक शाश्वत व फायदेशीर पर्याय म्हणून पुढे येत आहे.
सध्या रब्बी हंगामातील पिके काढणीच्या अंतिम टप्प्यात असून, खरीपपूर्व मशागतीची तयारी सुरू झाली आहे. शेतांमध्ये नांगरणी, वखरणीबरोबरच मोठ्या प्रमाणात शेणखत टाकण्याची कामे सुरू आहेत. परिसरात रानोराणी ट्रॅक्टरद्वारे शेणखत टाकण्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. गाई-म्हशींचे शेण, गोमूत्र, कंपोस्ट खत, गांडूळ खत (वर्मी कंपोस्ट) यांचा वापर वाढत आहे.
स्थानिक बाजारात शेणखताच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली असून, एका ट्रॅक्टर शेणखतासाठी सुमारे २५०० ते ३५०० रुपये दर आकारले जात आहेत. खताची गुणवत्ता, कुजलेपणा आणि ओलावा यावर दर ठरवला जात असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
शेतकऱ्यांच्या मते, सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीची भुसभुशीतता वाढते, पाण्याची धारण क्षमता सुधारते आणि पिकांची वाढ नैसर्गिक पद्धतीने होते. दीर्घकालीन दृष्टीकोनातून सेंद्रिय शेतीमुळे उत्पादन स्थिर राहून खर्च कमी होतो, असेही शेतकरी सांगतात.
काही प्रगतिशील शेतकरी सेंद्रिय शेतीसोबतच पीक फेरपालट, आंतरपीक पद्धती, जैविक कीडनियंत्रण यांसारख्या आधुनिक पद्धतींचाही अवलंब करत आहेत. कृषी विभागाकडूनही सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना व मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात आहे.
एकूणच, वाढत्या खर्चामुळे अडचणीत सापडलेल्या कुऱ्हाड परिसरातील शेतकऱ्यांनी आता शाश्वत आणि पर्यावरणपूरक शेतीचा मार्ग स्वीकारला असून, यामुळे येणाऱ्या काळात जमिनीची सुपीकता वाढून उत्पादनात भर पडेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.



Post a Comment
0 Comments