दिशा लाईव्ह न्यूज — लोहारा, ता. पाचोरा
लोहारा व परिसरातील नागरिकांना गेल्या दोन महिन्यांपासून महावितरणच्या ढिसाळ व मनमानी कारभाराचा मोठा फटका बसत असून, ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
गावातील कासमपुरा रोडवरील स्ट्रीट लाईट्स दिवसा देखील सतत सुरूच राहत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर वीज वाया जात असून, महावितरणच्या निष्काळजीपणाचे हे जिवंत उदाहरण असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून दिली जात आहे. दुसरीकडे, गावातील अनेक भागांमध्ये रात्रीच्या वेळी पथदिवे बंदच राहतात. त्यामुळे नागरिकांना अंधारातच वावरावे लागत असून, अपघात तसेच चोरीसारख्या घटनांचा धोका वाढला आहे.
विशेष म्हणजे, गावातील प्रमुख चौकांमधील लाईट्स देखील बंद असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही अधिकारी कोणतीही कार्यवाही करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “गावाला कोणी वाली आहे की नाही?” असा सवाल आता संतप्त नागरिक उपस्थित करत आहेत.
ग्रामस्थांनी महावितरण प्रशासनाकडे मागणी केली आहे की, गावातील सर्व पथदिव्यांची तातडीने दुरुस्ती करून विद्युत पुरवठा सुरळीत करावा. तसेच दिवसा विनाकारण सुरू असणाऱ्या लाईट्स तात्काळ बंद करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.
जर याकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर ग्रामस्थांकडून आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे आता महावितरणचे संबंधित अधिकारी यावर कितपत गांभीर्याने कार्यवाही करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“बिल मात्र वेळेवर… पण वीज कधी येईल याची शाश्वती नाही!”
लोहारा येथील महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त; उकाड्यात वारंवार वीज खंडित होऊन संतापाचा उद्रेक
लोहारा गावातील वीजपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून महावितरण कंपनीच्या ढिसाळ आणि बेफिकीर कारभारामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत.
नागरिकांकडून दर महिन्याला नियमितपणे वीजबिलाची वसुली केली जाते, मात्र त्याबदल्यात सुरळीत वीजपुरवठा देण्यात महावितरण पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचे चित्र सध्या गावात आणि परिसरात पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे, सध्या ना पाऊस, ना वादळ, ना वारा… कोणतीही नैसर्गिक आपत्ती नसताना देखील लोहारा गावातील विविध भागांमध्ये दिवस-रात्र वारंवार वीज खंडित केली जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या संतापात भर पडत असून “नेमका बिघाड आहे तरी कुठे?” असा सवाल आता सामान्य जनतेकडून उपस्थित केला जात आहे.
सध्या उन्हाचा तीव्र तडाखा आणि प्रचंड उकाडा सुरू असताना वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने लहान मुले, वृद्ध, महिला आणि आजारी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक भागांमध्ये रात्रीच्या वेळी अचानक लाईट बंद होत असल्याने नागरिकांची झोप उडाली असून घरगुती कामे, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, व्यवसाय आणि विद्यार्थ्यांचा अभ्यासही प्रभावित होत आहे.
महावितरण कंपनीकडून या समस्येबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने नागरिक अधिक संतप्त झाले आहेत. “बिल थकले तर तत्काळ कारवाई केली जाते, मग नागरिकांना दर्जेदार सेवा देण्याची जबाबदारी महावितरणची नाही का?” असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
लोहारा शहरातील वाढत्या वीज समस्येकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देणे गरजेचे असून वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा नागरिकांचा संताप आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


Post a Comment
0 Comments