दिशा लाईव्ह न्यूज-:--महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सोयगाव आगारातील दोन कर्तव्यदक्ष व प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा सेवानीवृत्ती सोहळा अत्यंत उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला. लोहारा, ता.पाचोरा येथील चालक अशोक फकीरा गिते (सेवा २६ वर्षे) आणि आंबेडा येथील वरिष्ठ नियंत्रक कृष्णा बाबुराव मिसाळ (सेवा ३० वर्षे) यांनी आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकतीच निवृत्ती घेतली.
या निमित्ताने सोयगाव आगारात त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार प्रमुख मनीष जावळेकर होते. यावेळी आगारातील अधिकारी, कर्मचारी, निवृत्त कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेवाभाव आणि कर्तव्यनिष्ठेचा गौरव
दोन्ही कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवाकाळात प्रवासी सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रामाणिकपणे काम केले. त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, वेळेचे भान आणि सहकाऱ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध यांचा कार्यक्रमात विशेष उल्लेख करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रशिक्षणार्थी युवकांचाही सत्कार
कार्यक्रमात मागील वर्षी आयटीआय उत्तीर्ण होऊन सोयगाव आगारात एक वर्ष सेवा पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी युवकांचाही विशेष सत्कार करण्यात आला. युवकांनी आपल्या कौशल्याने व मेहनतीने आगाराच्या कामकाजात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
सन्मानचिन्ह व शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान करताना त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली. यावेळी अशोक फकिरा गिते व कृष्णा मिसाळ यांनी आपल्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.
भावनिक वातावरणात निरोप
कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. स्नेह, कृतज्ञता आणि आपुलकीच्या वातावरणात हा निरोप समारंभ पार पडला. या सोहळ्याने उपस्थितांच्या मनात कायमची आठवण निर्माण केली.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला माजी पोलीस अधिकारी, स्थानिक नेते, सामाजिक कार्यकर्ते तसेच कुटुंबातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील आयुष्याला शुभेच्छा दिल्या.




Post a Comment
0 Comments