Type Here to Get Search Results !

वरसाडे गावातील महिलांचा धाडसी पुढाकार; अवैध धंद्यांना बसला आळा पोलीस स्टेशन हद्दीतील इतर गावांनीही घ्यावा आदर्श – API कल्याणी वर्मा यांचे आवाहन



कुऱ्हाड प्रतिनिधी - सुनील लोहार.

दिशा लाईव्ह न्यूज --::---पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन हद्दीतील वरसाडे तांडा येथे महिलांनी दाखविलेल्या धाडस, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीमुळे गावातील अवैध धंद्यांवर मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे. गावातील महिला भगिनींनी एकजुटीने पुढाकार घेत अवैध दारू विक्री, जुगार, मटका तसेच इतर बेकायदेशीर प्रकारांविरोधात आवाज उठवला.



महिलांनी वेळोवेळी पोलिसांना अचूक आणि गोपनीय माहिती पुरविल्यामुळे संबंधितांवर प्रभावी कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे गावातील वातावरण अधिक सुरक्षित, शांततामय आणि कायद्याचे पालन करणारे बनले आहे. गावात निर्माण झालेल्या सकारात्मक बदलामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

महिलांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पिंपळगाव हरे पोलीस स्टेशनच्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) कल्याणी वर्मा यांच्या हस्ते सर्व महिला भगिनींचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी महिलांच्या धाडसाचे कौतुक करत सांगितले की, “गुन्हेगारीविरोधातील लढा हा केवळ पोलिसांचा नसून संपूर्ण समाजाचा आहे. महिलांनी दाखविलेला हा आदर्श इतर गावांसाठी प्रेरणादायी आहे.”


पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, समाजातील प्रत्येक महिला ही केवळ आपल्या कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण गावाच्या सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडणारी घटक आहे. अवैध धंदे हे अनेक कुटुंबांचे आर्थिक, सामाजिक आणि नैतिक नुकसान करतात. त्यामुळे अशा कृत्यांविरोधात निर्भयपणे पुढे येणे ही काळाची गरज आहे.

महिलांनी दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, याची ग्वाही देत त्यांनी सांगितले की, “अवैध धंद्यांविरोधात माहिती देणाऱ्या नागरिकांचे संरक्षण आणि गोपनीयता राखणे ही पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे कोणत्याही भीतीशिवाय पुढे या.”

यावेळी त्यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील इतर गावांतील महिला, बचत गट, सामाजिक संस्था तसेच सर्व नागरिकांना आवाहन केले की, आपल्या परिसरातील अवैध दारू विक्री, जुगार, मटका, गुटखा, अमली पदार्थ आणि इतर बेकायदेशीर प्रकारांविषयी तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी.

“तुमचा हा लढा केवळ अवैध धंद्यांविरोधात नसून आपल्या गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे. तुमच्या धाडसामुळे अनेक कुटुंबे व्यसनमुक्त व सुरक्षित जीवन जगू शकतील,” असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.



या सत्कार समारंभास गावातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तसेच सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ आणि विविध सामाजिक कार्यकर्त्यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून महिलांच्या कार्याचे कौतुक केले.

वरसाडे गावाने दाखवलेला हा आदर्श संपूर्ण परिसरासाठी प्रेरणादायी ठरत असून, महिलांच्या एकजुटीमुळे समाजातील वाईट प्रवृत्तीला कशाप्रकारे आळा घालता येतो याचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे.

Post a Comment

0 Comments