Type Here to Get Search Results !

ओढणीने गळा आवळून विवाहितेचा खून; पतीविरोधात राजगड पोलिसात गुन्हा 6 महिन्यांपूर्वीच महिला आयोगात तडजोड; दीड वर्षाच्या चिमुकल्यावर मातृछाया हरपली


                         मयत -:-ऋतुजा तावरे

प्रतिनिधी- हवेली | 18 जून 2026

पती-पत्नीतील सततच्या घरगुती वादातून एका 25 वर्षीय विवाहितेचा ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना हवेली तालुक्यातील आर्वी येथे मंगळवारी (दि. 17 जून) दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी पतीविरोधात राजगड पोलीस ठाण्यात खून आणि क्रूरतेचा गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

मयत महिलेचे नाव रुतुजा अक्षय तावरे (वय 25, रा. आर्वी, ता. हवेली, जि. पुणे) असे आहे. या घटनेत तिच्या दीड वर्षांच्या युवराज या चिमुकल्यावर मातृछाया हरपली असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकरणातील आरोपी पती अक्षय रामदास तावरे (वय 28, रा. आर्वी) याच्याविरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 225/2026 नुसार भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 103 व 85 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

                 महिला आयोगात तडजोड, तरीही छळ सुरूच

मयत रुतुजाचा भाऊ अनिकेत दादासो पवार (रा. पणदरे, ता. बारामती) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रुतुजाचे लग्न 16 मे 2023 रोजी अक्षय तावरे याच्याशी झाले होते. विवाहानंतर अवघ्या सहा महिन्यांतच पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणांवरून वाद सुरू झाले. हे वाद पुढे वाढत जाऊन मारहाण व मानसिक छळापर्यंत पोहोचले.


                          आरोपी-अक्षय तावरे

या सततच्या त्रासाला कंटाळून रुतुजा सुमारे सहा महिन्यांपूर्वी माहेरी परतली होती. त्यानंतर प्रकरण बारामती येथील महिला आयोगापर्यंत गेले. आयोगासमोर दोन्ही कुटुंबांची सुनावणी होऊन तडजोड करण्यात आली होती. त्यानुसार रुतुजा पुन्हा पतीकडे राहण्यास गेली.

मात्र ही तडजोड फार काळ टिकली नाही. दीड महिन्यानंतर पुन्हा वाद आणि छळ सुरू झाल्याने एप्रिल 2026 मध्ये रुतुजा पुन्हा माहेरी आली. 4 मे रोजी तिच्या भावाने तिला सासवड येथे सोडले असता आरोपीने तिला पुन्हा आर्वी येथे नेले होते.

                           ओढणीने गळा आवळून हत्या

मंगळवारी दुपारी सुमारे 2:45 वाजण्याच्या सुमारास अनिकेत पवार यांना त्यांच्या नातेवाईकांकडून फोनवरून माहिती मिळाली की, रुतुजाचा खून झाला आहे. राजगड पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनीही याची पुष्टी केली.

प्राथमिक माहितीनुसार, आरोपी अक्षय तावरे याने घरगुती भांडणाच्या कारणावरून रुतुजाचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून खून केला. घटनेनंतर तिला तातडीने श्लोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

                          तक्रार दाखल, आरोपी फरार

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी खेड-शिवापूर पोलीस चौकी गाठून लेखी तक्रार दिली. FIR मध्ये नमूद केल्याप्रमाणे, आरोपीने वारंवार शारीरिक व मानसिक छळ करून अखेर खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास हेड कॉन्स्टेबल मयूर महादेव निंबाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड तपास अधिकारी आहेत. पोलीस निरीक्षक जाधव हे प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

मयत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून आरोपी पती फरार झाला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली असून पुढील तपास सुरू आहे.

                         समाजमन सुन्न

घरगुती वादातून एवढ्या टोकाला जाऊन एका तरुणीचा बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एका निष्पाप चिमुकल्याला आईपासून कायमचे दूर करणारी ही घटना समाजमनाला चटका लावणारी ठरली आहे.

Post a Comment

0 Comments