पहूर प्रतिनिधी- ता. जामनेर
दिशा लाईव्ह न्यूज:- : जामनेर तालुक्यातील दोंदवाडे येथील तरुण शेतकरी जयसिंग शिवलाल डोभाळ (राजपूत) (वय 36) यांनी कर्जबाजारीपणा व आर्थिक विवंचनेला कंटाळून गुरुवारी सकाळी सुमारे 10 वाजता आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. तसेच शेतातील विहिरीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानीचा पंचनामा होऊनही शासनाकडून अद्याप कोणतीही आर्थिक मदत मिळाली नसल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले होते. वाढते कर्ज, शेतीतील नुकसान आणि आर्थिक ताण यामुळे त्यांची मानसिक स्थिती खालावली होती. या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईक व ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.
जयसिंग डोभाळ यांच्या पश्चात आई, एक भाऊ व तीन बहिणी असा परिवार आहे. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने संपूर्ण दोंदवाडे गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे.
या प्रकरणी मोहन शिवलाल परदेशी यांनी दिलेल्या माहितीवरून पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन पहूर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Post a Comment
0 Comments