Type Here to Get Search Results !

लोहारा येथील मा. सरपंच व आदर्श व्यक्तिमत्त्व स्व. अक्षयकुमार जैस्वाल यांचा वाढदिवस अनाथांच्या सहवासात साजरा


दिशा लाईव्ह न्यूज :-:आज दि. १७ जून रोजी लोहारा येथील मा. सरपंच व सर्वांच्या मनात घर केलेले आदर्श व्यक्तिमत्त्व स्व. अक्षयकुमार जैस्वाल यांचा वाढदिवस अत्यंत भावनिक वातावरणात जळगाव येथील केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित आनंदाश्रम येथे साजरा करण्यात आला.



गेल्या अनेक वर्षांपासून लोहारा नगरीच्या विकासासाठी झटणारे, सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात कायम सहभागी होणारे स्व. अक्षयकुमार जैस्वाल यांचा वाढदिवस गावासाठी एक उत्सवच असायचा. त्यांच्या एका हाकेला धावून येणारी माणसं, शुभेच्छांचा वर्षाव आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं कायमचं स्मित… हे सगळं आजही गावकऱ्यांच्या डोळ्यांसमोर जिवंत आहे.

              परंतु नियतीला काही वेगळंच मंजूर होतं…

दि. ३० जानेवारी रोजी भाऊ अचानक आपल्यातून निघून गेले आणि लोहारा नगरीवर शोककळा पसरली. आजही "भाऊ आहेतच" असा भास अनेकांच्या मनात कायम आहे. त्यांच्या आठवणींनी डोळे नकळत पाणावतात…



"दुनियासे जानेवाले, न जाने चले जाते हैं कहाँ..."

ही ओळ आज प्रत्येकाच्या मनात खोलवर उमटत होती.

यावर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कुटुंबियांनी अत्यंत हृदयस्पर्शी आणि माणुसकी जपणारा निर्णय घेतला. जळगाव येथील आनंदाश्रमात जाऊन तेथील आबालवृद्ध, अनाथ व निराधार महिला-पुरुषांसोबत हा दिवस साजरा करण्यात आला.


आश्रमातील प्रत्येक वृद्ध व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू फुलावं, त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण यावेत, यासाठी जैस्वाल कुटुंबीयांनी प्रेमाने गोड जेवण दिलं. इतकंच नाही, तर प्रत्येक वृद्ध पुरुषाला मोठा रुमाल आणि महिलांना चांगल्या दर्जाच्या सुमारे २५ साड्या भेट देण्यात आल्या.

त्या क्षणी वृद्धांच्या डोळ्यातील आनंदाश्रू आणि दिलेल्या आशीर्वादांनी वातावरण भारावून गेलं.



हा वाढदिवस केवळ एक स्मरणदिन नव्हता, तर स्व. अक्षयकुमार जैस्वाल यांच्या विचारांचा, त्यांच्या माणुसकीचा आणि समाजसेवेच्या परंपरेचा एक जिवंत वारसा होता.

यावेळी त्यांच्या पत्नी ग. भा. सरोजजी जैस्वाल, मुलगा मयुर जैस्वाल, मुलगी सिद्धी, तसेच सून पूजा जैस्वाल उपस्थित होते. कुटुंबीयांच्या डोळ्यांत दाटलेलं दुःख आणि त्याच वेळी भाऊंच्या आठवणी जपण्याचा निर्धार स्पष्ट जाणवत होता.

तसेच सामाजिक कार्यकर्ते मनोज सोनार, गजानन परदेशी व इतर मान्यवरांनीही उपस्थित राहून स्व. जैस्वाल यांच्या कार्याला अभिवादन केले.

स्व. अक्षयकुमार जैस्वाल हे नाव केवळ व्यक्तीचं नव्हतं, तर ते एक भावना होती…

आजही ते प्रत्येकाच्या हृदयात जिवंत आहेत, त्यांच्या कार्यातून, त्यांच्या आठवणींतून… आणि अशाच सेवाभावी कार्यातून त्यांची आठवण सदैव जिवंत राहील.

नावच ‘अक्षय’… आठवणीही अक्षयच!

लोहारा नगरीत जेव्हा स्व. अक्षयकुमार जैस्वाल यांचं नाव घेतलं जातं, तेव्हा ते फक्त एका व्यक्तीचं नाव राहत नाही… तर ती एक प्रेरणा, एक विचारधारा आणि एक जिवंत संस्कारांची परंपरा बनते.

“अक्षय” म्हणजे कधीही न संपणारा… आणि खरंच, त्यांचं कार्य, त्यांची माणुसकी, त्यांचं प्रेम – हे सगळं आजही तितकंच जिवंत आहे, जसं ते आपल्या सोबत होते त्या काळात होतं.

गावाच्या विकासासाठी त्यांनी घेतलेली धडपड ही केवळ कर्तव्य नव्हती, तर ती त्यांच्या मनातील गावाविषयीच्या प्रेमाची खरी ओळख होती. रस्ते, सुविधा, सार्वजनिक कामं यापलीकडे जाऊन त्यांनी लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला. "आपला माणूस" अशी ओळख निर्माण करणं, हेच त्यांच्या कामाचं खरं यश होतं.

त्यांच्या नेतृत्वात लोहारा नगरीने केवळ भौतिक विकास नाही, तर सामाजिक आणि मानवी मूल्यांचा देखील विकास अनुभवला. प्रत्येकाच्या अडचणीत धावून जाणारा, दुःखात आधार देणारा आणि आनंदात सहभागी होणारा असा त्यांचा स्वभाव गावकऱ्यांच्या मनात खोलवर कोरला गेला आहे.

त्यांचं कुटुंबही तितकंच सुसंस्कृत आणि प्रेमळ…

घरातले संस्कार, एकमेकांबद्दलचा जिव्हाळा आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी हे त्यांच्या कुटुंबाचं वैशिष्ट्य आहे. आजही त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रत्येक कृतीतून भाऊंचेच विचार आणि मूल्ये दिसून येतात.

त्यांच्या जाण्यानंतर निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही, पण त्यांच्या आठवणी मात्र प्रत्येकाला पुढे जाण्याची प्रेरणा देत राहतील.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ आणि वृद्धांसोबत केलेला साजरा हा फक्त कार्यक्रम नव्हता, तर तो त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा एक सुंदर प्रयत्न होता.

स्व. अक्षयकुमार जैस्वाल हे नाव नाही, ती एक भावना आहे…

जी काळाच्या पलीकडे जाऊनही कायम “अक्षय” राहील.

Post a Comment

0 Comments