Type Here to Get Search Results !

भारताची सुरसम्राज्ञी सुमन कल्याणपूर यांना अखेरचा निरोप; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार..संगीत विश्वावर शोककळा.



दिशा लाईव्ह न्यूज--::-- : हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील आपल्या मधुर, भावपूर्ण आणि सुरेल गायकीने अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका Suman Kalyanpur यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वावर शोककळा पसरली असून एका सुवर्णयुगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे. 

वयोमानानुसार उद्भवलेल्या आरोग्यविषयक समस्यांमुळे त्यांनी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच संगीत क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते, कलाकार आणि असंख्य चाहत्यांनी दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. 

सोमवारी मुंबईतील पवनहंस स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबीय, नातेवाईक, संगीत क्षेत्रातील मान्यवर आणि चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या लाडक्या गायिकेला अखेरचा निरोप दिला. 



सुमन कल्याणपूर यांनी हिंदी, मराठी, बंगाली, कन्नड, भोजपुरी, आसामीसह अनेक भाषांमध्ये हजारो गीते गायली. "आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे", "ना ना करते प्यार", "तुमने पुकारा और हम चले आये", "दिल एक मंदिर है"  जिंदगी इमतेहन लेती है....आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे  हर जुबा पर....

रहें ना रहें हम महका करेंगे....यांसारखी अजरामर गीते आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. त्यांच्या गायकीतील माधुर्य, शास्त्रीय संगीताचा पाया आणि भावपूर्ण सादरीकरणामुळे त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. 

त्यांच्या संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय संगीतसृष्टी समृद्ध केली आणि अनेक पिढ्यांच्या भावविश्वावर अधिराज्य गाजवले. 

सुमन कल्याणपूर यांच्या निधनामुळे भारतीय संगीतविश्वाने एक सुरेल, सोज्वळ आणि अजरामर आवाज गमावला आहे. त्यांच्या स्वरांचा ठेवा मात्र कायम संगीतप्रेमींच्या हृदयात जिवंत राहील, अशा भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहेत. 

"स्वर थांबले असले तरी सुमनताईंची गाणी आणि आठवणी कायम अमर राहतील." 

Post a Comment

0 Comments