Type Here to Get Search Results !

सोशल मीडियावरील बुलंद आवाजाला मोठी जबाबदारी; किशोर रायसाकडा यांची जळगाव जिल्हा सोशल मीडिया प्रमुखपदी नियुक्ती!



दिशा लाईव्ह न्यूज -:-  समाजातील विविध प्रश्नांवर निर्भीडपणे भूमिका मांडत जनतेचा आवाज बुलंद करणारे, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावी जनजागृती करणारे किशोर रामदास रायसाकडा यांची धाडस सामाजिक संघटनेच्या जळगाव जिल्हा सोशल मीडिया प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे त्यांच्या सामाजिक कार्याला नवसंजीवनी मिळाली असून त्यांच्यावर अधिक मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

ही नियुक्ती संघटनेचे मराठवाडा विभागीय सचिव बाळासाहेब माने यांनी अधिकृत पत्राद्वारे जाहीर केली. गेल्या अनेक वर्षांपासून रायसाकडा यांनी सामाजिक, शैक्षणिक, कृषी, बेरोजगारी, भ्रष्टाचार तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवून प्रशासनाला जागे करण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण आणि अभ्यासू कामाची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे.



धाडस सामाजिक संघटना राज्यभर सामाजिक न्याय, जनजागृती आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी सक्रियपणे कार्यरत आहे. संस्थापक अध्यक्ष शरद (दादा) कोळी यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने अनेक सामाजिक उपक्रम राबविले असून, बदलत्या काळात सोशल मीडिया हे संघटनेचे प्रभावी शस्त्र बनले आहे. जळगाव जिल्ह्यात संघटनेची विचारधारा, सामाजिक उपक्रम आणि जनतेचे प्रश्न अधिक व्यापकपणे लोकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आता रायसाकडा यांच्यावर असणार आहे.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले की, आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे केवळ संवादाचे साधन नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. योग्य दिशेने वापर केल्यास हे माध्यम जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मोठी भूमिका बजावू शकते. किशोर रायसाकडा यांचा समाजकारणातील अनुभव, प्रश्नांवरील संवेदनशीलता आणि जनतेशी असलेला थेट संवाद यामुळेच त्यांची या पदासाठी निवड करण्यात आली आहे.



या नियुक्तीमुळे पाचोरा तसेच जळगाव जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते आणि पत्रकारांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आगामी काळात संघटनेचे कार्य अधिक गतिमान करून जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार रायसाकडा यांनी व्यक्त केला आहे.

विशेष म्हणजे, रायसाकडा यांनी यापूर्वीही महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष म्हणून कार्य करताना अनेक उल्लेखनीय उपक्रम राबविले आहेत. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी सातत्याने लढा दिला असून सध्या ते प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारीही सांभाळत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना मुंबई, पुणे, ठाणे, शिर्डी आदी ठिकाणी विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

तसेच, सामाजिक क्षेत्रात त्यांनी पाचोरा कोळी समाजाचे तालुका अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. समाजातील तळागाळातील लोकांशी जोडून काम करण्याची त्यांची शैली हीच त्यांच्या यशामागील खरी ताकद मानली जाते.

एकूणच, सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी आणि समाजातील प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी किशोर रायसाकडा यांची ही नियुक्ती जळगाव जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments