Type Here to Get Search Results !

गुरांचा चारा व शेती साहित्य आगीत भस्मसात; शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान — नाईकनगर येथील हृदयद्रावक घटना


कुऱ्हाड प्रतिनिधी – सुनील लोहार

दिशा लाईव्ह न्यूज --:::---कुऱ्हाड परिसरातील नाईकनगर येथे आज दुपारी घडलेली आग दुर्घटना एका शेतकऱ्यासाठी मोठा आर्थिक व मानसिक आघात ठरली आहे. मलखान भुरा चव्हाण या शेतकऱ्याच्या लाख रस्त्यालगत असलेल्या शेतातील पत्र्याच्या शेडला आज सोमवारी सायंकाळी सुमारे चार वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. काही क्षणांतच या आगीने भीषण रूप धारण करत संपूर्ण शेड आणि त्यातील सर्व साहित्य जाळून खाक केले.



या आगीत शेतकऱ्याने गुरांसाठी साठवून ठेवलेला चार महिन्यांचा चारा, कुट्टी तसेच शेतीसाठी लागणारी महत्त्वाची अवजारे पूर्णपणे नष्ट झाली. याशिवाय विद्युत पंप, केबल वायर, मल्चिंग पेपर, स्टार्टर आदी अत्यावश्यक शेती साहित्य देखील आगीत जळून खाक झाले. अंदाजे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान या घटनेत झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

घटनेच्या वेळी शेत परिसरात कोणीही नसल्याने आग कशी लागली, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. गावकऱ्यांनी शक्य ते प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत सर्व काही राख झाले होते.


आधीच आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या मलखान चव्हाण यांना या घटनेमुळे मोठा मानसिक धक्का बसला आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि शेतीची घडी पुन्हा बसविणे हे आता त्यांच्यासाठी मोठे आव्हान बनले आहे.

या घटनेचा पंचनामा करून शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्याने प्रशासनाकडे केली आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन त्वरित मदतीचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

ही घटना केवळ एका शेतकऱ्याचे नुकसान नसून, ग्रामीण भागातील असुरक्षित शेती व्यवस्थेचे ज्वलंत उदाहरण ठरत आहे.

Post a Comment

0 Comments