Type Here to Get Search Results !

जामनेर पंचायत समितीचा तांत्रिक सहाय्यक ३० हजारांची लाच मागताना एसीबीच्या जाळ्यात



दिशा लाईव्ह न्यूज --::----जळगाव जिल्ह्यातील जामनेर पंचायत समितीमध्ये लाचखोरीचे प्रकरण उघडकीस आले असून, विहीर अनुदान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या कंत्राटी तांत्रिक सहाय्यकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार शेतकऱ्याला शासनाच्या विहीर अनुदान योजनेअंतर्गत विहिरीसाठी मंजुरी मिळाली होती. मंजुरीनंतर संबंधित जागेची पाहणी करून तांत्रिक अहवाल सादर करणे आणि पुढील अनुदान प्रक्रिया पूर्ण करणे ही जबाबदारी पंचायत समितीतील तांत्रिक सहाय्यक सागर अशोक नावकर (वय ३२) यांच्याकडे होती.

तक्रारीनुसार, विहिरीच्या प्रस्तावित जागेची पाहणी करण्यापूर्वीच ग्रामरोजगार सेवकाच्या माध्यमातून तक्रारदाराकडून ३० हजार रुपये स्वीकारण्यात आले होते. त्यानंतर पाहणी व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि तक्रारदाराला टप्प्याटप्प्याने ६० हजार ९६६ रुपयांचे अनुदान मिळाले.

दरम्यान, उर्वरित अनुदान मिळवून देण्यासाठी पुन्हा ३० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप तक्रारदाराने केला. संबंधित रक्कम दिल्याशिवाय पुढील अनुदानाची प्रक्रिया पूर्ण होणार नसल्याचे सांगितल्याने तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार दाखल केली. 


एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता पंचांसमक्ष लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर जामनेर पोलीस ठाण्यात सागर नावकर यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अनुदान प्रक्रियेत इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. 


या कारवाईमुळे पंचायत समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शेतकरी व नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडून लाचेची मागणी होणे ही गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. 

Post a Comment

0 Comments