दिशा लाईव्ह न्यूज::---:: शेंदुर्णी येथील मूळ रहिवासी तथा सध्या छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास असलेल्या सौ. ज्योती एकनाथ कोल्हे-भुते (बारी) यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्याकडून विद्या वाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सौ. कोल्हे-भुते यांनी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत "Impact of Farmer Producer Company on Rural Livelihood of Small and Marginal Farmers in Aurangabad District" या विषयावर संशोधन कार्य पूर्ण केले. शेतकरी उत्पादक कंपन्यांचा (एफपीसी) लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या ग्रामीण उपजीविकेवर होणारा परिणाम या महत्त्वपूर्ण विषयाचा त्यांनी सखोल अभ्यास केला आहे. कृषी क्षेत्रातील बदल, शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाच्या दृष्टीने हे संशोधन उपयुक्त ठरणार असल्याचे मानले जात आहे.
त्यांचे संशोधन कार्य शेंदुर्णी येथील आप्पासाहेब भा. र. गरुड वरिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या प्रा. डॉ. योगिता चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. संशोधन प्रक्रियेदरम्यान त्यांनी विविध गावांमध्ये जाऊन माहिती संकलित केली तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून निष्कर्ष मांडले.
सौ. ज्योती कोल्हे-भुते यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शेंदुर्णी येथील राजमल लखीचंद ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी जळगाव येथील जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयातून उच्च शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाची जिद्द कायम ठेवत त्यांनी राज्य पात्रता परीक्षा (SET) यशस्वीरित्या उत्तीर्ण केली.
प्रतिकूल परिस्थिती, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि नोकरी सांभाळत त्यांनी संशोधन कार्य सातत्याने सुरू ठेवले. कठोर परिश्रम, चिकाटी आणि शिक्षणावरील निष्ठेच्या बळावर त्यांनी पीएच.डी. पदवी संपादन करून शेंदुर्णी परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी त्यांचे यश प्रेरणादायी ठरत आहे.
त्यांच्या या यशाबद्दल मार्गदर्शक प्रा. डॉ. योगिता चौधरी, कुटुंबीय, मित्रपरिवार, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच शेंदुर्णी परिसरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Post a Comment
0 Comments