Type Here to Get Search Results !

लोहारा येथील आजोळ असलेल्या डॉ. प्रीतीश चौधरी यांना मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते ‘नियतीचे चक्र’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरव. जिल्ह्यातील अनेक मान्यवरांकडून शुभेच्छा!! लोहारा (ता. पाचोरा) येथील सुपुत्राचा राज्यस्तरीय सन्मान.


दिशा लाईव्ह न्यूज ::--:: पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील रहिवासी व दादाश्री विश्व ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रीतीश गणेश चौधरी यांना दिव्याज फाउंडेशनतर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘नियतीचे चक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून समाजहिताचे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील निवडक व्यक्तींना हा मानाचा पुरस्कार दिला जातो. 


२०२६ सालच्या पुरस्कारासाठी डॉ. चौधरी यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील कार्याची दखल घेण्यात आली. मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा येथे आयोजित विशेष सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

२१ जून रोजी भारतीय जैन संघटना आणि दिव्याज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस तसेच शांतीलाल मुथा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


डॉ. प्रीतीश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली दादाश्री विश्व ग्रुपच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, आरोग्यविषयक जनजागृती तसेच बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य सातत्याने केले जात आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. चौधरी यांनी सांगितले की, “हा सन्मान समाजसेवेची जबाबदारी अधिक वाढवणारा असून शोषित, वंचित आणि गरजू घटकांच्या न्यायासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा देणारा आहे.” 

या सन्मानामुळे लोहारा गावासह संपूर्ण पाचोरा तालुक्यात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून डॉ. प्रीतीश चौधरी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



Post a Comment

0 Comments