दिशा लाईव्ह न्यूज --::---पाचोरा तालुक्यातील आंबे वडगाव ते वरखेडी मार्गावर परवा सोमवारी रात्री झालेल्या भीषण पियाजिओ रिक्षा अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका ज्येष्ठ प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून रस्त्याच्या मध्यभागी टाकून ठेवलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरखेडी येथील सुकलाल भोई हे सोमवारी रात्री आपल्या पियाजिओ रिक्षातून सोयगाव येथून वरखेडीकडे प्रवाशांना घेऊन जात होते. दरम्यान, आंबे वडगाव-वरखेडी मार्गावर रस्त्याच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा टाकून ठेवण्यात आला होता. रात्रीचा अंधार आणि अपुरी दृश्यमानता यामुळे हा अडथळा चालकाच्या लक्षात आला नाही.
यामुळे रिक्षा थेट मातीच्या ढिगाऱ्यावर चढली आणि चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रिक्षा जोरदार पलटी झाली. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. या अपघातात रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक प्रवासी जखमी झाले.
या दुर्घटनेत जामनेर तालुक्यातील कुंभारी येथील रंगनाथ काशिनाथ जोशी (वय ७४) हे गंभीर जखमी झाले होते. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे पाचोरा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले; मात्र प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
जोशी यांच्या निधनाने कुंभारी गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, तसेच रस्त्याच्या मध्यभागी मातीचा ढिगारा कोणी आणि का टाकला याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी रस्त्यांवरील अडथळे तातडीने हटवून आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणीही जोर धरत आहे.
दरम्यान, पिंपळगाव हरेश्वर पोलीस यांनी घटनेची नोंद घेतली असून अपघाताचे नेमके कारण आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे. वैद्यकीय अहवाल आणि अधिकृत नोंदीनंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Post a Comment
0 Comments