दिशा लाईव्ह न्यूज --::--पहूर-शेंदुर्णी मार्गावर शनिवारी (दि. २७) दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण कार-दुचाकी अपघाताने संपूर्ण परिसर हादरला. या अपघातात दोन कष्टकरी, होतकरू तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कानसखेडा व देवगाव या दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे. काही क्षणांत दोन संसार उद्ध्वस्त झाल्याने नातेवाईकांसह ग्रामस्थांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल ज्ञानेश्वर कोळी (वय २९, रा. कानसखेडा, ता. जळगाव) व संतोष उर्फ सागर तुकाराम सोनवणे (वय २५, रा. देवगाव, जि. जळगाव) हे दोघे नात्याने मामे-आते भाऊ असून मजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शनिवारी ते दुचाकीवरून पहूरहून शेंदुर्णीकडे जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच-१५ केजी-३६८८ क्रमांकाच्या कारने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की राहुल कोळी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांच्या शेजारी असलेले संतोष उर्फ सागर सोनवणे गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर तडफडत होते. अपघात पाहताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. काही क्षणांतच घटनास्थळी मोठी गर्दी झाली. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते तसेच पोलीस कर्मचारी राहुल पाटील, मनोज धनगर, संदीप धनगर, आकाश देशमुख आणि चालक हेमंत सोनवणे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने दोघांना पहूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. नजमुद्दीन तडवी यांनी तपासणीनंतर राहुल कोळी यांना मृत घोषित केले. संतोष सोनवणे यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि उपचारादरम्यान त्यांचीही प्राणज्योत मालवली.
या अपघाताने दोन निष्पाप कुटुंबांचा आधार हिरावून घेतला आहे. राहुल कोळी यांच्या पश्चात पत्नी, लहान मुलगी, आई-वडील असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर संतोष उर्फ सागर सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, लहान मुलगा तसेच आई-वडील असा परिवार असून त्यांच्या निधनाने घरातील आनंद क्षणात विरून गेला. दोघेही मेहनत-मजुरी करून संसाराचा गाडा ओढत होते. कष्टाने उभे केलेले संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाल्याने नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
अपघाताची बातमी कानसखेडा आणि देवगाव येथे पोहोचताच दोन्ही गावांमध्ये शोककळा पसरली. नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली. मृतदेह पाहून कुटुंबीयांनी केलेला आक्रोश उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आणणारा होता.
शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असून रविवारी सकाळी दोघांवर त्यांच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
दरम्यान, या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून कारचालक वासुदेव खुशाल वारके याला कारसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघाताचे नेमके कारण काय, कारचा वेग किती होता आणि अपघाताला कोण जबाबदार आहे, याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
या दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा भरधाव वाहनचालना आणि निष्काळजीपणामुळे निष्पाप जीव जात असल्याची वेदनादायक वास्तवता समोर आली असून, दोन्ही कष्टकरी तरुणांच्या अकाली निधनाबद्दल परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.




Post a Comment
0 Comments