Type Here to Get Search Results !

पत्रकारांचा सन्मान करा, अन्यथा रस्त्यावर उतरू.---द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष कल्पना पवार यांचा इशारा!


दिशा लाईव्ह न्यूज-:- (दिनेश चौधरी,-लोहारा )---पत्रकारांवरील वाढते हल्ले, अपमानास्पद वक्तव्ये, खोटे गुन्हे दाखल करणे आणि सोशल मीडियावरील बदनामीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा कल्पना पवार यांनी तीव्र भूमिका घेतली आहे. पत्रकारांचा सन्मान राखला गेला नाही आणि अन्यायाच्या घटनांवर कठोर कारवाई झाली नाही, तर संघटना राज्यभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

कल्पना पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, सध्या पत्रकारांवर हल्ले करणे, धमक्या देणे, शिवीगाळ करणे आणि त्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्याचे प्रकार वाढले असून ही बाब लोकशाहीसाठी धोकादायक आहे.



त्यांनी राज्य सरकारकडे पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी, पत्रकारांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण तसेच पत्रकार पेन्शन योजनेतील अटी शिथिल करण्याची मागणी केली आहे. पत्रकार सुरक्षित असतील तरच लोकशाही अधिक मजबूत राहील, असे त्यांनी नमूद केले.

कल्पना पवार म्हणाल्या की, एखाद्या पत्रकारावर अन्याय झाला तर केवळ निषेध व्यक्त करून थांबणे पुरेसे नाही. सर्व पत्रकार संघटना, पदाधिकारी आणि पत्रकारांनी संघटितपणे संबंधित पत्रकाराच्या पाठीशी उभे राहून कायदेशीर व लोकशाही मार्गाने लढा दिला पाहिजे. पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई झाली तरच अशा घटनांना आळा बसेल.

त्यांनी पत्रकार संघटनांनाही एकजूट राखण्याचे आवाहन केले. एखाद्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर किंवा पत्रकारावर अन्याय झाल्यास सर्व संघटनांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे, असे त्या म्हणाल्या. पत्रकारांच्या प्रश्नांवर राजकारण न करता त्यांच्या हक्कांसाठी एकसंघ लढा उभारणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

"गप्प बसण्याचे दिवस संपले आहेत. पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही निश्चितच आवाज उठवू. अन्याय, अपमान आणि दडपशाहीविरोधात आता संघटितपणे लढण्याची वेळ आली आहे. 'कलमाची ताकद वाढवूया' हा निर्धार करून प्रत्येक पत्रकाराने एकजूट दाखवावी," असे आवाहनही कल्पना पवार यांनी केले.

पत्रकार सुरक्षित राहिले तर लोकशाही सुरक्षित राहील, हा संदेश देत द युवा ग्रामीण पत्रकार संघाने पत्रकारांच्या सन्मान आणि संरक्षणासाठी राज्यव्यापी जनजागृती व आवश्यकतेनुसार आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.

Post a Comment

0 Comments