दिशा लाईव्ह न्यूज ::--::– लोहारा, ता.पाचोरा सह चाळीसगाव शहरातील खाटीक समाजासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी उल्लेखनीय कामगिरी कु. अफरोज मोहम्मद रफीक हाजी बिस्मिल्लाह खाटीक हिने केली आहे. तिची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांच्या केरळ येथे आयोजित विशेष वैज्ञानिक प्रशिक्षण व परीक्षण कार्यक्रमासाठी परिक्षणार्थी विद्यार्थिनी म्हणून निवड झाली आहे.
या निवडीमुळे लोहारा व चाळीसगाव शहरासह खाटीक समाज आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्याची मान उंचावली असून सर्वत्र तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अत्यंत जिद्द, मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर अफरोजने हे यश संपादन केले आहे. तिच्या या यशामागे तिचे कुटुंब, शिक्षक आणि मार्गदर्शक यांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले जात आहे.
कु. अफरोज ही चाळीसगाव येथील मान्यवर डॉ. मोहम्मद रफीक हाजी बिस्मिल्लाह खाटीक(लोहारेकर ) यांची कन्या असून ती लोहारा, ता. पाचोरा येथील हाजी महेमुद हाजी बिस्मिल्ला यांची पुतणी आहे. पारंपरिक व्यवसाय करणारे, पण शिक्षणाला प्राधान्य देणारे सुसंस्कृत आणि आदर्श कुटुंब तिच्या पाठीशी उभे आहे. घरातील शैक्षणिक वातावरणामुळेच अफरोजला लहानपणापासून विज्ञान क्षेत्राची आवड निर्माण झाली.
अफरोजच्या या यशामुळे समाजातील इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून ग्रामीण भागातील मुलींनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असा संदेश तिच्या यशातून मिळत आहे.
तिच्या पुढील शैक्षणिक आणि वैज्ञानिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत. भविष्यातही ती अशीच यशाची नवी शिखरे गाठून देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


Post a Comment
0 Comments