दिशा लाईव्ह न्यूज----(सुनील लोहार) कुऱ्हाड खुर्द (ता. पाचोरा) परिसरात शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. नैसर्गिक आपत्ती, पावसाचा लहरीपणा आणि शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर यंदा वाढत्या खर्चाचा आणखी मोठा बोजा पडला आहे. बी-बियाणे, खते, कीटकनाशके आणि मजुरीच्या दरात झालेली प्रचंड वाढ यामुळे शेती करणे परवडेनासे झाले आहे.
अशा प्रतिकूल परिस्थितीतही खरीप हंगाम हातातून जाऊ नये म्हणून शेतकरी नव्या आशेने शेतात उतरले आहेत. परिसरात ठिबक सिंचनावर कपाशी लागवडीचे काम वेगाने सुरू असून, काही ठिकाणी पावसाच्या आशेवर धूळपेरणीची तयारीही केली जात आहे.
दरम्यान, या परिस्थितीची जिवंत आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना सोमवारी (दि. ८) उघडकीस आली. कुऱ्हाड खुर्द येथील शेतकरी ज्ञानेश्वर रतन शहाणे यांनी उमरदे शिवारातील शेतजमीन कसण्यासाठी घेतली आहे. मात्र घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने शेतीसाठी आवश्यक भांडवल उभे करणे त्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरत आहे.
बैलजोडी खरेदीसाठी किमान ८० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत खर्च येत असल्याने ते परवडत नसल्यामुळे या शेतकऱ्याने अक्षरशः हतबल होऊन आपल्या पोटच्या दोन्ही लेकरांना औताला जुपून सरी पाडण्याचे काम केले. दिवसभर उन्हात कष्ट करून त्यांनी सुमारे चार एकर क्षेत्रावर कपाशी लागवडीसाठी सरी तयार केल्या.
ही केविलवाणी परिस्थिती पाहून शेतशिवारातून जाणारे इतर शेतकरीही भावूक झाले. “मजूर मिळत नाहीत आणि मिळाले तरी त्यांचे दर परवडत नाहीत, त्यामुळे अशा कठीण निर्णयांना सामोरे जावे लागते,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.
आज शेती व्यवसायात उत्पादन खर्च प्रचंड वाढला असताना उत्पन्न मात्र अनिश्चित आहे. पावसाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान होते, तर बाजारात योग्य दर मिळेल याची शाश्वती नसते. परिणामी शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकत चालला आहे.
या घटनेमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची खरी परिस्थिती समोर आली असून, शासनाने तातडीने मदतीचे हात पुढे करणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे. स्वस्त दरात बियाणे, खते उपलब्ध करून देणे, मजुरीसाठी योजना राबवणे आणि शेतीसाठी अनुदान वाढवणे या उपाययोजना तातडीने राबवण्याची गरज व्यक्त होत आहे.
एकीकडे “अन्नदाता” म्हणून गौरव केला जाणारा शेतकरी, तर दुसरीकडे आपल्या लेकरांना औताला जुपून शेती करण्याची वेळ — ही दाहक वास्तवता प्रशासन आणि समाजाला विचार करायला भाग पाडणारी आहे.





Post a Comment
0 Comments