दिशा लाईव्ह न्यूज --::--(सुनील लोहार )---कुऱ्हाड ता. पाचोरा येथील कुऱ्हाड खुर्द गावात घडलेली एक हृदयद्रावक घटना काल समाजमनाला अक्षरशः हादरवून गेली. अल्पभूधारक शेतकरी ज्ञानेश्वर रतन शहाणे (माळी) यांनी आपल्या पोटच्या दोन लेकरांना औताला जुंपून शेतात सरी पाडण्याचे काम केल्याची बातमी दि. ११ रोजी दिशा लाईव्ह न्यूज मध्ये प्रसिद्ध होताच संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.
ज्या हातात पुस्तकं असायला हवीत, त्या कोवळ्या हातांनी नांगर ओढल्याचं दृश्य अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारं ठरलं. ही केवळ एका कुटुंबाची कहाणी नसून, ग्रामीण भागातील बिकट होत चाललेल्या शेती व्यवस्थेचं जिवंत चित्र आहे.
ज्ञानेश्वर शहाणे हे अल्पभूधारक शेतकरी. सततच्या तोट्यामुळे आणि वाढत्या कर्जबाजारीपणामुळे यंदाच्या खरीप हंगामासाठी त्यांच्याकडे साधा पैसा देखील शिल्लक नव्हता. बैलजोडी घेण्याची ऐपत नसल्याने, हतबल होऊन त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना औताला जुंपून शेत तयार करण्याचा निर्णय घेतला. एक बाप म्हणून हा निर्णय किती वेदनादायक असेल, याची कल्पनाच मन सुन्न करून टाकते.
मात्र, या वेदनेला समाजानेही तितक्याच संवेदनशीलतेने प्रतिसाद दिला. बातमी प्रसिद्ध होताच विविध सामाजिक संघटना, व्यक्ती, तसेच शासनाच्या विविध स्तरांवरील अधिकारी व कर्मचारी यांनी शेतात जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली.
या घटनेची दखल घेत अशोक भाऊ जैन यांनी तात्काळ मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी रिसर्च फाऊंडेशनचे समन्वयक उदय महाजन, विक्रम आस्वर आणि जैन इरिगेशनचे मीडिया प्रमुख अनिल जोशी यांनी घटनास्थळी भेट देत या कुटुंबाला मोठा दिलासा दिला.
या मदतीअंतर्गत शेतासाठी बैलजोडी, त्या बैलांसाठी सहा महिने पुरेल इतका चारा, तसेच चार महिन्यांचा किराणा सामान देण्याची घोषणा करण्यात आली. याशिवाय गावातील दुर्गेश कृषी केंद्र यांच्या माध्यमातून मोफत कापूस बियाण्याच्या सात थैल्या देण्यात आल्या.
एकीकडे परिस्थितीने पिचलेल्या या कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू होते, तर दुसरीकडे समाजाने दिलेल्या आधारामुळे त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आशेचा किरण आणि हास्य फुलताना दिसले.
तसेच पाचोरा महसूल विभाग व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील या कुटुंबाची भेट घेऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचे आश्वासन दिले.
या सर्व घडामोडींनंतर, ज्ञानेश्वर शहाणे व त्यांच्या कुटुंबीयांनी दिशा लाईव्ह न्यूज तसेच मदतीचा हात पुढे करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
ही घटना केवळ एका शेतकऱ्याची नाही, तर संपूर्ण व्यवस्थेला विचार करायला लावणारी आहे. आजही काही कुटुंबं जगण्यासाठी किती कठीण परिस्थितीतून जात आहेत, याचं हे जिवंत उदाहरण आहे.
पण त्याचवेळी, समाजातली माणुसकी अजूनही जिवंत आहे, हेही या घटनेतून अधोरेखित झालं आहे.




Post a Comment
0 Comments