Type Here to Get Search Results !

कपाशी व्यवहारातून शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक?; शिवसेनेचे पोलीस ठाण्यात निवेदन — पीडितांना पुढे येण्याचे आवाहन



दिशा लाईव्ह न्यूज --:::: ---(दिनेश चौधरी,लोहारा )  पाचोरा तालुक्यातील तारखेडा व परिसरातील शेतकऱ्यांची कपाशी खरेदी व्यवहारातून कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी शिवसेना पाचोरा तालुकाप्रमुख राजेंद्र दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी पाचोरा पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले असून, तात्काळ कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे,----पाचोरा येथे मागील सुमारे २० वर्षांपासून वास्तव्यास असलेले कपाशी व्यापारी हरिदास मोहनदास ठक्कर यांनी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर कपाशी उधारीवर खरेदी केली होती. काही शेतकऱ्यांना धनादेश देण्यात आले असले तरी अनेकांचे पैसे अद्याप थकीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, संबंधित व्यापारी अचानक कुटुंबासह फरार झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या मालाचे पैसे न मिळाल्यामुळे मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. काहींवर कर्जाचा बोजा वाढला असून शेतीचा पुढील हंगाम कसा चालवायचा, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

शेतकऱ्यांची अडचण वाढली----- कपाशी हा प्रमुख नगदी पीक असल्यामुळे शेतकरी या उत्पन्नावरच वर्षभराच्या खर्चाची योजना आखतात. मात्र पैसे न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. बँक कर्ज, खत-बियाण्यांचा खर्च, मजुरी यांसाठी घेतलेली देणी फेडणे कठीण झाले आहे.

पोलीस तपासाची मागणी--- शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील यांनी या प्रकरणात सखोल चौकशी करून संबंधित व्यापाऱ्याविरुद्ध फसवणूक, विश्वासघात व आर्थिक अपहाराचे गुन्हे तात्काळ दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच आरोपीचा शोध घेण्यासाठी मोबाईल सीडीआर, बँक व्यवहार, यूपीआय ट्रान्झॅक्शन, सीसीटीव्ही फुटेज, टोल नाका नोंदी यांची तपासणी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments