Type Here to Get Search Results !

कुऱ्हाड तांडा येथील शेतकऱ्याची ₹1 लाख 56 हजारांची फसवणूक; न्यायासाठी पोलीस ठाण्यात धाव



कुऱ्हाड प्रतिनिधी :सुनील लोहार.

दिशा लाईव्ह न्यूज -:-- पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा येथील शेतकरी सुभाष तारू वंजारी यांनी आपल्या शेतासाठी जैन कंपनीचे ठिबक सिंचन घेण्याच्या उद्देशाने सुमारे सहा महिन्यांपूर्वी पाचोरा येथील स्वामी समर्थ ठिबक या दुकानाचे संचालक एकनाथ रमेश पाटील यांना ₹1 लाख 56 हजारांची रोख रक्कम दिल्याचा आरोप केला आहे.

मात्र, मे महिना संपूनही ठिबक सिंचन संच उपलब्ध करून देण्यात आला नाही. तसेच संबंधित दुकानदाराने वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही फोन उचलला नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्याच्या लक्षात आले. या घटनेमुळे शेतकऱ्याला मोठा मानसिक धक्का बसला आहे.

शेतकरी सुभाष वंजारी यांनी पत्नीचे सोन्याचे मंगळसूत्र मोडून ठिबक खरेदीसाठी पैसे उभे केले होते. दरम्यान, संबंधित दुकानदाराने दिलेला रकमेचा धनादेशही बँकेत अनादरित (बाऊन्स) झाल्याने त्यांची आर्थिक अडचण अधिकच वाढली.

निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच शेती व्यवसाय तोट्यात असताना अशा प्रकारच्या कथित फसवणुकीमुळे आपण आर्थिक संकटात सापडलो असून आत्महत्येची वेळ आल्याची व्यथा शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.

या प्रकरणी मंगळवारी सकाळी शेतकरी सुभाष वंजारी यांनी पिंपळगाव हरे पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. संबंधित व्यक्तीकडून दुप्पट रक्कम वसूल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, इतर शेतकऱ्यांनी अशा व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगावी, तसेच फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून पीडित शेतकऱ्याला न्याय मिळावा, अशी मागणी होत आहे.

टीप : वरील वृत्त हे तक्रारदाराने केलेल्या आरोपांवर आधारित आहे. संबंधित व्यक्तीची बाजू समोर आल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

Post a Comment

0 Comments