Type Here to Get Search Results !

लोहारा परिसरात समाधानकारक पाऊस; पिकांना जीवदान, विहिरींना पाझराची प्रतीक्षा – शेतकऱ्यांना दिलासा, मात्र जोरदार पावसाची अजूनही प्रतीक्षा




दिशा लाईव्ह न्यूज--::--- पाचोरा  तालुक्यातील लोहारा व परिसरात झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या या पावसामुळे पेरणी केलेल्या कापूस, सोयाबीन, मका, बाजरी व इतर खरीप पिकांना आवश्यक ओलावा मिळाला आहे. त्यामुळे शेतशिवार हिरवाईने नटू लागले असून पिकांची उगवण वेगाने होत आहे.

यंदाही मान्सूनने सुरुवातीला अपेक्षित साथ न दिल्याने लोहारा व परिसरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. वेळेवर पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी पिके लहान, कमकुवत आणि पिवळसर दिसत होती. काही शेतांमध्ये उगवणच झाली नव्हती, तर काही ठिकाणी पिके वाळण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होत होती.


सध्याच्या पावसामुळे परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाली असली तरी जलस्रोतांची अवस्था अद्याप चिंताजनक आहे. परिसरातील अनेक विहिरी, बोअरवेल आणि शेततळी अजूनही पुरेशा प्रमाणात भरलेली नाहीत. जमिनीला ओलावा मिळाला असला तरी भूजल पातळी वाढण्यासाठी आणि विहिरींना पाझर सुरू होण्यासाठी आणखी जोरदार व सातत्यपूर्ण पावसाची गरज आहे.

शेती हा पूर्णपणे पावसावर अवलंबून असलेला व्यवसाय असल्याने दरवर्षी बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांनाच बसत आहे. वाढते बियाणे, खत, औषधे, मशागतीचा खर्च आणि मजुरी यामुळे शेती करणे दिवसेंदिवस अधिक कठीण होत आहे. अशा परिस्थितीत पाऊस वेळेवर न झाल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडून जाते.


लोहारा परिसरात यंदाही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने नद्या-नाले अद्याप पूर्ण क्षमतेने वाहू शकलेले नाहीत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याचाही प्रश्न कायम आहे. पुढील काही दिवसांत दमदार पाऊस झाल्यासच विहिरींना पाझर फुटेल, नद्या-नाले वाहू लागतील आणि खरीप पिकांना आवश्यक बळ मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.


        प्रतिक्रिया – कृषिभूषण ज्ञानेश्वर माळी (लोहारा)

"शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून धरणीमातेच्या कुशीत बीज रोवले होते. अनेक दिवस पावसाची प्रतीक्षा होती. अखेर झालेल्या समाधानकारक पावसामुळे पिकांची सुमारे ९० टक्के उगवण झाली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा पाऊस झाला नसता तर अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असते. काही शेतकऱ्यांनी हातउसनवारी केली, काहींनी सोने गहाण ठेवले तर काहींनी कर्ज काढून पेरणी केली होती. त्यामुळे हा पाऊस त्यांच्यासाठी नवसंजीवनी ठरला आहे. 

मात्र विहिरी, बोअरवेल आणि जलस्रोत अद्याप भरलेले नाहीत. आता जोरदार आणि सातत्यपूर्ण पावसाची गरज असून तो झाल्यासच शेतीला खरी ताकद मिळेल आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर कायमचे समाधान दिसेल."

Post a Comment

0 Comments