दिशा लाईव्ह न्यूज --::-- (दिनेश चौधरी, )-- लोहारा,ता.पाचोरा येथील डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या अभिनव शैक्षणिक उपक्रमांची माहिती देण्यासाठी पालक-शिक्षक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. एम. सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
विद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी काहींना लेखन-वाचनात अडचणी जाणवत असल्याने त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विशेष लेखन-वाचन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या उपक्रमामागे विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम, प्रत्येक विद्यार्थी सक्षम व्हावा ही तळमळ आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची विद्यालयाची बांधिलकी स्पष्टपणे दिसून येते.
मुख्याध्यापक पी. एम. सुर्वे हे आदर्श, शिस्तप्रिय आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. विद्यालयातील शिस्त, शिक्षकांमधील समन्वय, विद्यार्थ्यांप्रती जिव्हाळा आणि पालकांशी सातत्यपूर्ण संपर्क या गुणांमुळे विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता दिवसेंदिवस उंचावत आहे. शिक्षक बांधवांकडून प्रेमाने, विश्वासाने आणि संघभावनेतून काम करून घेण्याची त्यांची कार्यशैली सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
उपमुख्याध्यापक आर. जी. बैरागी यांनी प्रास्ताविकात विद्यालयातील विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. शिक्षक ए. एस. इंगळे व एस. पी. तडवी यांनी लेखन-वाचन वर्गाची आवश्यकता, विद्यार्थ्यांमध्ये झालेली प्रगती आणि पुढील नियोजन याविषयी मार्गदर्शन केले. वरिष्ठ शिक्षक व्ही. पी. वानखेडे यांनीही उपक्रमाचे कौतुक करत पालकांनी मुलांच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष देण्याचे आवाहन केले.
यावेळी पालकांनी विद्यालयाच्या उपक्रमांचे कौतुक करत मुख्याध्यापक व शिक्षकांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यालय सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असल्याचे मत पालकांनी मांडले.
सभेला संजय लोहार, शिवाजी कोळी, अशोक उखर्डे पाटील, प्रवीण देशमुख, ईश्वर देवकर माळी, भारत पाटील, शरद देशमुख, सुनिता राजेंद्र कुंभार, सुरेश चौधरी यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते. उपस्थित पालकांचा व भगिनींचा विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. एन. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन आर. के. सुरवाडे यांनी मानले. विद्यालयाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यातील समन्वय अधिक दृढ होऊन गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलले गेल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Post a Comment
0 Comments