दिशा लाईव्ह न्यूज --::-- आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी होत चाललेल्या जगात अजूनही काही माणसं अशी आहेत, जी कोणताही गाजावाजा न करता, प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता माणुसकी जपण्याचं काम करत असतात. लोहारा येथील रहिवासी तथा सध्या नोकरीनिमित्त भुसावळ येथे वास्तव्यास असलेले संजय भाऊ ठोसर हे त्यापैकीच एक नाव आहे.
सर्वसामान्य कुटुंबातून आलेले संजय भाऊ आर्थिकदृष्ट्या अतिशय श्रीमंत नसले तरी त्यांच्या मनातील माणुसकी आणि दातृत्व हे अमूल्य आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते लोहारा येथील नाना भाऊ लोहार आणि त्यांच्या वृद्ध आईला दरमहा कोणताही खंड न पडू देता आर्थिक मदत करत आहेत. विशेष म्हणजे, ही मदत केवळ औपचारिक नसून त्यांच्याबद्दलची आत्मीयता, आपुलकी आणि काळजी यातून ती सातत्याने पोहोचवली जाते.
नाना भाऊ हे मुकबधीर असून त्यांची आई सुमारे ८० वर्षांच्या आहेत. घरात आधार देणारे कोणीही नसताना, या वयातही त्या शेतात मजुरी करतात, गोवऱ्या गोळा करतात, भांडी घासण्याची कामे करतात आणि मिळेल त्या कामातून आपल्या मुलाचा उदरनिर्वाह चालवतात. परिस्थिती अत्यंत कठीण असली तरी त्यांनी कधीही प्रामाणिकपणाची साथ सोडलेली नाही.
अशा या माय-लेकरांच्या आयुष्यात संजय भाऊ ठोसर हे जणू देवदूत बनून आले आहेत. त्यांची नियमित मदत हा त्या दोघांसाठी केवळ आर्थिक आधार नसून जगण्याचा विश्वास आहे. प्रत्येक महिन्याला त्यांची मदत पोहोचते तेव्हा वृद्ध आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटतात आणि त्या मनापासून संजय भाऊंना भरभरून आशीर्वाद देतात.
समाजात अनेकदा मोठमोठ्या देणग्यांची चर्चा होते, मात्र गरजू व्यक्तीच्या गरजेच्या वेळी सातत्याने दिलेला हात हा खऱ्या अर्थाने सर्वात मोठा दानधर्म असतो. संजय भाऊ ठोसर यांनी गेली तीन वर्षे कोणतीही प्रसिद्धी, सत्कार किंवा अपेक्षा न ठेवता जपलेली ही माणुसकी समाजासाठी प्रेरणादायी आहे.
आज समाजाला अशाच संवेदनशील, प्रेमळ आणि दानशूर व्यक्तिमत्त्वांची गरज आहे. संजय भाऊ ठोसर यांचे कार्य हे केवळ एका कुटुंबाला आधार देणारे नसून, समाजात माणुसकीची ज्योत तेवत ठेवणारे आहे.
संजय भाऊंना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि त्यांच्या सेवाभावी कार्याला अधिकाधिक बळ मिळो, हीच त्या माय-लेकरांसह संपूर्ण समाजाची मनापासून सदिच्छा आहे
*********************************************
प्रतिक्रिया--श्री पी. एस. चौधरी सर.
रेल्वेमध्ये लोको पायलट म्हणून कार्यरत असलेले आणि प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहून माणुसकीची सेवा करणारे , आजच्या समाजासाठी एक खऱ्या अर्थाने 'दूत' आणि प्रेरणास्थान ठरलेले संजयभाऊ ठोसर
आजच्या सोशल मीडिया आणि दिखाव्याच्या युगात, जिथे लोक छोट्याशा कामाचेही मोठे भांडवल करून स्वतःची स्तुती करून घेण्यात धन्यता मानतात, तिथे संजय भाऊंचे कार्य अगदी वेगळे आणि मनाला भिडणारे आहे.
"हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणाऱ्या" या जगात, रेल्वेचे इंजिन चालवताना हजारो प्रवाशांची जबाबदारी सांभाळणारे लोको पायलट संजय भाऊ ठोसर आपल्या वैयक्तिक आयुष्यातही तितक्याच जबाबदारीने माणुसकीचे चक्र चालवत आहेत. अत्यंत विनम्र, सुसंस्कृत आणि सदाचारी कुटुंबातून आलेले संजय भाऊ हे केवळ एक रेल्वे कर्मचारी नसून, ते लोहारा येथील एका निराधार कुटुंबासाठी आशेचा किरण बनले आहेत.
आज आपण पाहतो की, अनेक जण 'मी हे केले, मी ते केले' असे सांगून लोकांकडून "फुकटात" कौतुक करून घेण्याचा प्रयत्न करतात. ते स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेतात. अनेकांसाठी समाजसेवा ही केवळ स्वतःच्या प्रसिद्धीचे माध्यम झाली आहे. पण संजय भाऊंचे विचार आणि कृती याला अपवाद आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून लोहारा येथील एका मुकबधिर मुलाला आणि त्यांच्या ८० वर्षांच्या वृद्ध आईला ते दरमहा न चुकता आर्थिक मदत करत आहेत, पण त्यांनी कधीही याचा गाजावाजा केला नाही.ना कधी कौतुकाची अपेक्षा केली नाही स्वतःचे नाव व्हावे, लोकांनी स्तुती करावी ही कोणतीही अपेक्षा न ठेवता, केवळ त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा हेच एकुलते एक ध्येय त्यांनी डोळ्यासमोर ठेवले.
गरजवंताला जेव्हा खरोखर मदतीची गरज असते, तेव्हा दिलेला शांत आणि खंबीर हात हाच सर्वात मोठा दानधर्म असतो. संजय भाऊंनी आपल्या कर्तव्यातून हे सिद्ध केले आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे त्या वृद्ध माऊलीच्या डोळ्यात येणारे आनंदाश्रू आणि त्यांनी दिलेले मनापासूनचे आशीर्वाद हीच संजय भाऊंच्या कार्याची खरी पावती आहे.
स्वतःच्या स्तुतीपेक्षा कर्तव्याला आणि माणुसकीला मोठे मानणाऱ्या संजय भाऊ ठोसर यांच्या या महान कार्याला 'दिशा लाईव्ह न्यूज'चा अत्यंत मानाचा मुजरा. अशा संवेदनशील, प्रेमळ आणि दानशूर व्यक्तिमत्त्वाची आज समाजाला खरी गरज आहे. संजय भाऊंना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा!

Post a Comment
0 Comments