Type Here to Get Search Results !

गंभीर गुन्हा घडण्यापूर्वीच जामनेर पोलिसांची धडक कारवाई; तलवारीसह आरोपी जेरबंद



दिशा लाईव्ह न्यूज,--: : --जामनेर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जामनेर पोलिसांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करत संभाव्य गंभीर गुन्हा घडण्यापूर्वीच आरोपीला अटक केली आहे. हातात ३२ इंच लांबीची धारदार स्टीलची तलवार घेऊन संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी शिताफीने जेरबंद करत त्याच्याकडून तलवार जप्त केली. या कारवाईमुळे संभाव्य अनर्थ टळल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. ९ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जुना बोदवड नाका परिसरात एक इसम धारदार तलवार घेऊन फिरत असून तो गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत आहे. माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलीस निरीक्षक कासार यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने विशेष पथक तयार करण्यात आले.



सहाय्यक फौजदार साहिल तडवी, पोलीस अधिकारी प्रताप मथुरे, सचिन महाजन, राजेश लहासे आणि गजानन माळी यांच्या पथकाने परिसरात सापळा रचून संशयिताचा शोध घेतला. काही वेळातच हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या इसमाला पोलिसांनी वेढा घालून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव भिकन किसन घिसाडी (वय ४२), रा. गोविंद महाराज झोपडपट्टी, जामनेर असे सांगितले.

झडतीदरम्यान आरोपीकडून ३२ इंच लांबीची स्टीलच्या पात्याची, टोकदार मूठ असलेली धारदार तलवार जप्त करण्यात आली. संबंधित व्यक्तीकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२८/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय शस्त्र अधिनियम, १९५९ च्या कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन महाजन यांनी फिर्याद दिली आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पार पडली. कारवाईत सहभागी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या सतर्कता, धाडस आणि तत्परतेमुळे संभाव्य गुन्हा रोखण्यात यश आले.

जामनेर शहरात अवैध शस्त्र बाळगणारे, कायदा हातात घेणारे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशा धडक कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

Post a Comment

0 Comments