Type Here to Get Search Results !

गरिबीतून उंच भरारी... सेवाभावाची परंपरा जपणारे सामाजिक कार्यकर्ते संदीप भाऊ व्यंकट कोळी यांचा प्रेरणादायी वाढदिवस


दिशा लाईव्ह न्यूज --::--- ( दिनेश चौधरी, लोहारा )--लोहारा,ता.पाचोरा  येथील सामाजिक कार्यकर्ते, बांधकाम व्यावसायिक आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्व श्री. संदीप भाऊ व्यंकट कोळी यांनी आपल्या ४० व्या वाढदिवसानिमित्त कोणताही दिखाऊ सोहळा न करता समाजोपयोगी उपक्रम राबवत वाढदिवस संस्मरणीय केला. जय बजरंग व्यायाम शाळा परिसरात त्यांनी स्वखर्चाने वड, पिंपळ आणि उंबर यांसारखी दाट सावली देणारी, भरपूर प्राणवायू निर्माण करणारी आणि पर्यावरणासाठी अत्यंत उपयुक्त झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचीही जबाबदारी स्वीकारली.



व्यायाम शाळा परिसरात बसण्यासाठी किंवा सावलीसाठी मोठी झाडे नसल्याची जाणीव ठेवून त्यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. आज लावलेली ही रोपे उद्या विशाल वृक्ष बनून असंख्य नागरिकांना सावली, शुद्ध हवा आणि पर्यावरणाचा अमूल्य वारसा देतील, हीच त्यांच्या वाढदिवसाची खरी भेट ठरली.



संदीप भाऊ कोळी हे केवळ यशस्वी बांधकाम व्यावसायिक नाहीत, तर समाजासाठी जगणारे व्यक्तिमत्त्व म्हणून संपूर्ण लोहारा पंचक्रोशीत परिचित आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते जय बजरंग व्यायाम शाळेची निस्वार्थपणे देखरेख करत आहेत. रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, स्मशानभूमी स्वच्छता, मुक्या प्राण्यांना जीवदान देणे, गरजूंना मदतीचा हात देणे अशा असंख्य सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. कोणावरही संकट आले की सर्वप्रथम धावून जाणारा माणूस म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.



त्यांचा जीवनप्रवास संघर्षाने भरलेला आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले. घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती, बहिणींच्या विवाहाची जबाबदारी आणि कुटुंबाचा भार लहान वयातच त्यांच्या खांद्यावर आला. मोलमजुरी करत, उन्हातान्हात राबत त्यांनी जीवनाची वाटचाल सुरू ठेवली. कष्ट, प्रामाणिकपणा आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी बांधकाम क्षेत्रात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले. आज जवळपास १५ वर्षांपासून बांधकाम व्यवसायात ते विश्वासार्ह नाव म्हणून ओळखले जातात. गुणवत्तापूर्ण काम, दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती आणि प्रामाणिक व्यवहार यामुळे त्यांनी गावासह परिसरात मोठा विश्वास संपादन केला आहे.



संदीप भाऊ स्वभावाने अत्यंत शांत, संयमी आणि मनमिळावू आहेत. मित्रांसाठी जीव लावणारे, सर्वांना सोबत घेऊन चालणारे हे व्यक्तिमत्त्व अन्यायाच्या विरोधात मात्र तितक्याच ठामपणे उभे राहते. गावात काहीतरी नवीन, समाजासाठी उपयुक्त आणि प्रेरणादायी घडावे, ही त्यांची कायमची धडपड असते. त्यामुळे दरवर्षी वाढदिवस वेगळ्या सामाजिक संकल्पनेतून साजरा करण्याची त्यांची परंपराच बनली आहे.

वाढदिवसानिमित्त झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाला प्रविण धनगर, रतन पवार, ज्ञानेश जाधव, रामेश्वर जाधव, विशाल क्षिरसागर, आश्विन परदेशी, तनिश परदेशी, आकाश जाधव, गजानन कोळी, जयेश धनगर, गोलू चौधरी, गुणा चौधरी, आकाश चौधरी, आभि पाटील, सर्जिल शहा तसेच बहुसंख्य युवक उपस्थित होते. सर्वांनी वृक्षसंवर्धनाची शपथ घेत संदीप भाऊंच्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.


आज संदीप भाऊ ४१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. गरिबीतून उभे राहत स्वतःचे यश घडविण्याबरोबरच समाजालाही सतत काहीतरी देण्याचा त्यांचा प्रयत्न अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक वाढदिवस हा केवळ शुभेच्छांचा दिवस नसून समाजहिताचा नवा संकल्प घेऊन येतो, हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आहे.

आई जगदंबेच्या चरणी एकच प्रार्थना—संदीप भाऊंना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, अखंड यश आणि समाजसेवेचे बळ लाभो. त्यांच्या हातून अशीच असंख्य समाजोपयोगी कार्ये घडत राहोत आणि त्यांच्या प्रेरणेतून अनेक तरुण समाजकार्यात पुढे येवोत, हीच मनःपूर्वक सदिच्छा!

Post a Comment

0 Comments